चांगल्या दर्जाच्या कांद्याच्या उत्पादनासाठी आपल्या जवळचे बियाणे शेतात टाकावे असा शेतकऱ्यांचा आग्रह असतो, परंतु यंदा अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने कांद्याचे बियाणे पूर्णपणे भुईसपाट झाले. यामुळे आता कांद्याचे बियाणे आणायचे कोठून या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. कांदा बियाण्यांच्या तुटवडय़ामुळे सध्या अनेक भागात ते चोरीला जाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
काही महिन्यांपूर्वी कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीने ही स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कांदा बियाण्यात मोठी घट होणार असून, पुढील वर्षी हे बियाणे कसे उपलब्ध होईल याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. बाजारात कांदा बियाणे विक्रीसाठी येते. मात्र त्यापासून कांदा पीक चांगल्या दर्जाचे निघेल याची शाश्वती नसते. म्हणून शेतकरी स्वत: आपल्या शेतात हे बियाणे तयार करतात. स्वत: तयार केलेले बियाणे चांगल्या प्रतीचे असते. त्यामुळे त्याला बाजारभावही चांगला मिळतो. परंतु यंदा भीषण स्थिती निर्माण झाली आहे. नांदगाव व परिसरातील कांदा बियाणे चांगल्या प्रतीचे होते, पण त्यावर चोरटय़ांची नजर पडली असून शेतातून ते गायब होऊ लागले आहे. कांदा लागवडीवेळी पाच ते सहा हजार रुपये कांदा बियाणे शेतकऱ्यांना विकत घ्यावे लागत होते. मात्र आता यापेक्षाही कांदा बियाण्याचे भाव पुढे वाढतील, असे चित्र आहे. प्रत्येक गावात गारपिटीने मोठे नुकसान झाल्याने थोडय़ाच शेतकऱ्यांकडे कांद्याचे बियाणे शिल्लक आहेत. पुढील काळात बियाण्यांची प्रचंड टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अधिक पैसे मोजूनही भरवशाचे बियाणे मिळणार नाही. परिणामी, चोरीच्या घटना यापुढेही वाढण्याची शक्यता असून, रात्रभर शेतात राखण
करणेही अवघड आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा बियाण्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून, त्याचा विपरीत परिणाम पुढील काळात लागवड होणाऱ्या उशिराच्या खरीप तसेच रब्बी पिकावर होणार आहे. पुढील
काळात लागवडीसाठी कांदा बीजोत्पादनाची कमतरता भासणार आहे. निसर्गाने आधीच
सर्व काही हिरावून नेले आहे. आता उरले-सुरले पीकही चोरटे पळवून नेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा