सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या डाव्या कालव्याचे सिंचन रब्बी हंगामात देण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी साखळी उपोषण केले. कालव्यातून २९ किलोमीटर अंतरापर्यंत कालव्याचे पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.  
सालेकसाचे तहसीलदार शीतल यादव यांनी चार महिन्यांआधी डाव्या कालव्यातून २९ किलोमीटपर्यंत सिंचनाचा लाभ देण्याचे आश्वासन चार महिन्याआधी शेतकऱ्यांना दिले होते, मात्र पाणी वाटप समितीचे सल्लागार बठकांच्या तारखात वारंवार बदल करून कालवा दुरुस्तीचे कारण दाखवून शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पाटबंधारे विभागाच्या कामचुकार आणि शेतकरी विरोधी नीतीचा विरोध म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी ८ जानेवारीपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
उपविभागीय अभियंता राठोड यांनी मंडपाला भेट देऊन १३ जानेवारीला पाणीपुरवठा सल्लागार समितीची बठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांनी त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवला, मात्र बठकीच्या तारखेलाच त्यांनी बठक सालेकसाऐवजी आमगावात असल्याचे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. अधिकाऱ्यांच्या घुमजाव धोरणाचा शेतकऱ्यांनी विरोध केला असून त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन तसेच काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला.
उपोषण मंडपाला आमदार रामरतन राऊत यांनी भेट देऊन सिंचन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच सालेकसा तहसीलदार शीतल यादव, माजी मंत्री भरत बाहेकार यांनीही भेट दिली. त्वरित तोडगा काढा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप नेते राकेश शर्मा, उमेदलाल जैतवार, मुन्ना बिसेन, झनकलाल दमाहे, मनोज बोपचे आदींनी दिला आहे.

Story img Loader