बी-बियाणे व इतर कृषिपूरक वस्तूंची यंदा भाववाढ नाही. शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर असली तरी कृषी बाजारपेठेत अद्याप चहलपहल नाही. खते व बी-बियाणांनी दुकाने खचाखच भरली असली तरी आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याची पावले अद्यापही खरेदीसाठी वळलेली नाहीत, त्यामुळे दुकानदार त्याची चातकासारखी वाट पहात आहेत. विदर्भात बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे.
यंदा बी-बियाणे वा खतांची भाववाढ नाही. कृषी वस्तूंच्या विशेषत: खते वा बी-बियाणांच्या किमतीवर राज्य सरकारचे नियंत्रण असते. महत्तम किरकोळ भावापेक्षा (एमआरपी) अधिक भावात या वस्तू विकता येत नाहीत. स्पर्धेत त्या पेक्षा कमी भाव काही कंपन्या देत असल्या तरी नफ्याचे प्रमाण (प्रॉफिट ऑफ मार्जिन) त्यामानाने कमीच असते, असे ‘अंकूर सीड्स’चे डीलर तिरुपती अ‍ॅग्रो एजंसीजचे आशिष सावजी यांनी सांगितले. बाजारात कापसाचे (बीजी टू) वाण ९३० रुपयात उपलब्ध असून सोयाबीन चांगल्या प्रकारचे वाण साधारणत: १ हजार ७०० रुपयात उपलब्ध आहे. नागपुरात सर्वाधिक कापूस व त्याखालोखाल सोयाबीनच्या वाणाला मागणी असते. त्यानंतर भाजीपाला व इतर बियाणे विकली जातात. इतरांच्या तुलनेत सोयाबीन व कापसाला सर्वाधिक भाव मिळत असल्याने व रोख विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचा त्याकडे जास्त कल असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
मृग नक्षत्रापासून साधारणत: पेरणी सुरू होते. मृग नक्षत्राला केवळ सात-आठ दिवस शिल्लक असून अद्यापही बी-बियाणे वा खते खरेदीसाठी शेतकरी दुकानात वळलेला नाही. बाजारपेठ मात्र सज्ज आहे. विविध प्रकारची बी-बियाणे, संकरित वाण, कीटकनाशके, खते तसेच इतर कृषिपूरक वस्तूंचा दुकानदारांनी भरपूर साठा करून ठेवलेला आहे. गेल्या काही वर्षांतला अनुभव पाहता दुकानदारांनीही कमतरता भासणार नाही, एवढा मुबलक साठा करून ठेवलेला आहे. नागपूर जिल्ह्य़ात १ हजार २०० विक्रेते असून मुख्यत्वे सुभाष मार्गावर बी-बियाणे व इतर वस्तूंची दुकाने आहेत. या ठिकाणी फेरफटका मारला असता दुकानदार व कर्मचारी ग्राहकाची पर्यायाने शेतकऱ्यांची वाट पहात बसलेले दिसले. एखाद-दुसरा अपवाद वगळता कुठेही ग्राहकी दिसली नाही. विदर्भात बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे. यंदा लग्नाचे मुहूर्त लांबले. ३० मेपर्यंत मुहूर्त आहेत. शेतकरी लगीनसराईत गुंतला आहे. उन्हं तापतच आहे. त्यातच यंदा बँकांनीही असहकार पुकारला आहे. गेल्यावर्षीच्या कर्जाची परतफेड करून टाकली. नवे कर्ज मिळत नाही. हातात पैसा नाही. त्यामुळे बळीराजा चिंतीत आहे. हाताता पैसा नसल्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडू शकत नाही, ही वास्तविकता आहे. गेल्यावर्षी यावेळेस अर्धा सिझन संपला होता, असे बियाणे दुकानदारांनी सांगितले.
मृग नक्षत्र तोंडावर आले असतानाच पेरणीसाठी शेतकरी शेतात मशागतीसाठी राबत आहे. नांगरणी, वखरणी तसेच शेतातील कचरा वेचण्याचा कामे सुरू आहेत. नांगरणी, वखरणीसाठी बैलजोडीचा वापर होत असला तरी शक्य असेल तर ट्रॅक्टरचाही वापर केला जातो. ग्रामीण भागात सर्वत्र सध्या हेच चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा