भाजपचा आंदोलनाचा इशारा
विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना राज्य सरकारने अत्यल्प पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत नुकसानभरपाई देण्यात यावी अन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिला आहे.
विनोद तावडे अतिवृष्टीग्रस्त विदर्भाच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी उमरेड-भिवापूर या भागातील बेसूर नांद, चिखलापार येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आमदार सुधीर पारवे, डॉ. मुकेश मुदगल, गिरीश लेंडे, उमेश वाधमारे प्रतिभा मांडवकर, अरविंद गजभिये उपस्थित होते.
भाजपने प्रारंभीपासूनच १०० टक्के नुकसान भरपाई घोषित करण्याची मागणी केली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी देखाव्यासाठी विदर्भाचा वरवर दौरा केला. शेतक ऱ्यांची चेष्टा करणारे १७०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. अतिवृष्टी भागाची पाहणी १५ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, अद्यापपर्यंत परिसराची संपूर्ण पाहणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान दाखवू नका, असे आदेश देण्यात आले. ही परिस्थिती कानावर टाकण्यासाठी भाजप नेते मुख्यमंत्र्यांना येत्या २ सप्टेंबरला भेटून विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडणार आहेत. जर त्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही तर मात्र आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही तावडे यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्याने पेरणीसाठी कर्ज घेतले आहे. परंतु अतिवृष्टीमुळे त्याच्या शेतीचे पूर्ण नुकसान झाले असून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तो आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुधीर पारवे यांनी त्यांच्या मतदारसंघातील शेतक ऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि विशेष पॅकेजची मागणी केली. तसेच बेसूर गावातील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतीची, घरांची, जनावरे याची पाहणी झाली नसल्याचे आढळून आले आहे त्याची चार दिवसाच्या आत पाहणी करावी आणि नुकसान भरपाई आठ दिवसात देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा