विधानसभा निवडणुकीची धामधूम आटोपल्यानंतर आता सर्वत्र शहरांमध्ये दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी घरोघरी तयारी सुरू असताना विदर्भातील शेकडो शेतकरी विधवा आणि शेतकऱ्यांच्या घरी मात्र आजही अंधार असल्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
यावेळी सुरुवातीच्या काळात गारपिटीने आणि त्यानंतर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांकडे आज दोनवेळेचे जेवण कसे करावे अशी चिंता असताना त्यांच्याकडे जाण्यासाठी कोणालाही वेळ नसल्याचे दिसत आहे. विदर्भात गेल्या पाच वर्षांत नऊ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक शेतकरी कुटुंबे उपासमारीला तोंड देत आहेत. विदर्भात ३ लाखांवर कर्जबाजारी शेतकरी नैराश्यात गेल्यामुळे आत्महत्या करण्याच्या उंबरठय़ावर आहेत. अशा शेतकऱ्यांचा जीवन जगण्याचा अधिकार सुरक्षित करा, अशी मागणी विदर्भ आंदोलन समितीने केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेतले आहे. मात्र, ते फेडण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नाही. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातील अनेकांच्या घरी दयनीय अवस्था आहे.
शेतक ऱ्यांच्या मागण्यांसाठी सतत लढा देणारे विदर्भ जनआंदोलन समितीचे प्रमुख किशोर तिवारी म्हणाले, कापूस व सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने सुरू असताना प्रशासनाला त्याची काहीच चिंता नाही. लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल आणि त्यांच्यावर असलेले कर्ज माफ होईल अशी अपेक्षा असताना शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक घोषणा केल्या होत्या. मात्र, त्या घोषणा आज हवेत विरल्या आहेत.
दिवाळीनिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण असले तरी शेतकऱ्यांच्या घरी मात्र फटाके आणि फराळाचे पदार्थ तर सोडा, पण एकवेळेचे जेवण करणे कठीण झाले आहे. निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. त्यामुळे केंद्रात भाजपचे सरकार आले. राज्यातही भाजपचे सरकार येणार आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे, अशी मागणी तिवारी यांनी केली.
शेतकरी संघटनेचे नेते राम नेवले म्हणाले, दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांच्याजवळ आज पैसा नाही. त्यांच्या मालाला भाव नाही. शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी कर्जबाजारी असून त्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही त्यामुळे त्यांच्या घरी पूर्वी अंधार होता आणि आजही अंधार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा