आजकाल फोटो काढून झाले की, समाजसेवा संपते. त्याची बातमी झाली की, समाजसेवक नावारुपाला येतो. एखादा माणूस समस्या सुटावी याच्यासाठी खरेच झटत असतो का? उत्तरात बरीच प्रश्नचिन्हं दडली आहेत. या वर्षी मराठवाडय़ाचा दुष्काळ ही गंभीर समस्या आहे, याची जाणीवच अनेकांना उशिरा झाली. तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यावर नक्की काय करायचे, हे तरी कोणाला माहीत होते? पण काहींच्या डोक्यात दीर्घकालीन उपाययोजना सुरू होत्या. आपत्तीला संधी मानून मराठवाडय़ात गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. ही आपत्ती खऱ्या अर्थाने संधीत रूपांतरित होऊ शकते, असे मानून भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून बीड व इतर ३ दुष्काळी जिल्ह्य़ांत मोठे काम उभे राहिले. या कामांच्या भवताली एक चेहरा सतत चर्चेत होता, तो म्हणजे शांतिलाल मुथा!
दुष्काळ ही संधी मानून त्यांनी पुण्याहून आपल्या जन्मगावी म्हणजे डोंगरकिन्ही येथे मुक्काम हलवत जिल्ह्य़ातील शंभर तलावांतून गाळ काढण्याचे काम हाती घेतले. हे काम लोकसहभागातून व्हावे, या साठी प्रयत्न केले. अनुदान व केवळ प्रसिद्धीसाठी समाजसेवा करण्यापेक्षा समस्या दूर व्हावी, या साठी भारतीय जैन संघटनेने उभारलेले काम प्रेरणादायी ठरू शकेल.
बीड जिल्ह्य़ात दुष्काळाची स्थिती मोठी गंभीर. आष्टी, पाटोदा, शिरूर, बीड, गेवराई या पाच तालुक्यांत टँकर आणि चारा छावण्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळत होता. काही नेत्यांनी त्यात हात धुवून घेतले. काही जण ‘छावणीमय’ झाले. पण मूळ समस्या पाणी साठवणुकीची आहे, हे लक्षात यायला काही कालावधी जावा लागला. तलावांची संख्या जास्त असली तरी ती गाळाने भरल्यामुळे साठवण क्षमता कमी होत गेली. ती वाढवायची असेल तर काय करावे लागेल, याचा विचार सुरू झाला. सरकारी पातळीवरही तसे प्रयत्न सुरू झाले.
दरम्यान, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी प्लास्टिकच्या टाक्या घेऊन बरेच जण धावले. शांतिलाल मुथा, त्यांचे सहकारी राजेंद्र मुनोत, नितीन कोटेचा, किशोर पगारिया यांनी तलावांतील गाळ काढण्याचे नियोजन केले. भारतीय जैन संघटनेच्या तांत्रिक पथकाने ११९ तलावातून गाळ काढता येईल, असे कळविले. मुथा यांनी गावकऱ्यांच्या मदतीने गाळ काढता यावा, यासाठी दौरे केले. एकाच वेळी १०० जेसीबी, ३६ पोकलेन आणि दीड हजार ट्रॅक्टरद्वारे गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तो गाळ उचलून न्यावा, असे सांगितले जाते. पण ज्यांना ही वाहतूकही परवडत नव्हती, त्यांच्या शेतात गाळ नेऊन टाकण्यात आला. ज्या मजुरांनी गाळ काढला, त्यांना मजुरी दिली गेली. लोकही आनंदाने सहभागी झाले.
सुमारे तीन हजार एकर जमीन या कामामुळे सुपीक झाल्याचा दावा केला जात आहे. १०० तलावांतून २० लाख क्युबिक गाळ काढण्यात आला. हेच काम सरकारी यंत्रणेने केले असते, तर १०० कोटींचे अंदाजपत्रक तर नक्कीच तयार झाले असते. त्यामुळेच मुथा यांच्या सामाजिक जाणिवेचे आता राजकीय नेत्यांकडून कौतुक होत आहे.
पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही गावात शांतिलाल मुथा यांच्या वडिलांचे किराणा दुकान होते. बैलगाडीतून प्रवरानगर येथील कारखान्यावर ऊसतोड कामगारांसाठी किराणा मालाचे दुकान लावणाऱ्या वडिलांबरोबर शांतीलाल आवर्जून जात. तेव्हाच त्यांना परिस्थितीची जाणीव झाली होती. प्रतिकूल स्थितीतून जाताना सर्वाना बरोबर घेऊन काम करावे लागते, हा आदर्श समोर ठेवून त्यांनी यश मिळविले. पुणे येथे शिक्षण झाल्यानंतर बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या मुथा यांनी बीड जिल्ह्य़ात गाळ उपसण्याचे केलेले काम सध्या चर्चेत आहे. केवळ दुष्काळच नाही, तर देशातील बहुतांश आपत्तीच्या काळात भारतीय जैन संघटनेने वेगवेगळ्या प्रकारचे काम केले आहे. मग लातूरमधील भूकंपपीडित निराधार मुलांना मदतीचा हात देणे असो, वा एखादा शैक्षणिक प्रकल्प उभारण्याचा. जमिनीची सुपीकता वाढविणारा चेहरा म्हणून शांतिलाल मुथा सध्या चर्चेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा