गतवर्षी पाणीटंचाईने त्रस्त असलेला शेतकरी या हंगामात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादन घेऊन आपली विस्कटलेली आíथक घडी बसविण्याच्या मार्गावर असताना फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव गडगडले आहेत. ५ रुपयांपासून ते २० रुपयांपर्यंत सर्वच पालेभाज्या ग्राहकांच्या पिशवीत बसत आहेत. यामुळे शेतक-यांवर संक्रांत आल्याची भावना व्यक्त होत आहे.
 बीड जिल्हय़ात पालेभाज्यांसह फळभाज्यांचीही आवक वाढली आहे. शहरातील मंडईबरोबरच नेकनूर, हिरापूर, बीड, पाटोदा, आष्टी, केज, गेवराई या मोठय़ा बाजारपेठेतही भाज्यांचे भाव गडगडले आहेत. सर्वसामान्यांचा वांदा करणाऱ्या कांद्याने या वेळी मात्र शेतक-यांचाच वांदा केल्याचे दिसून येत आहे. १० ते २० रुपये किलोदरम्यान कांद्याची विक्री होत आहे. ज्या टोमॅटोने सर्वसामान्य ग्राहकांना दिवसा तारे दाखवले होते, ते टोमॅटो आज १० रुपये किलो दराने विक्री होत आहेत. मेथीच्या भाजीचीही आवक वाढल्याने पाच रुपयात पाच जुडी अशी अवस्था मेथीची झालेली आहे. मेथीप्रमाणेच कोथिंबीरही कवडीमोल भावात विक्री होत आहे. वांग्याच्या दराचे टोचणारे काटे आता सर्वसामान्यांना फायदेशीर ठरू लागले आहेत. १० रुपये किलोप्रमाणे वांग्याची विक्री होत आहे. कोबी आणि हिरवी मिरचीलाही आठवडी बाजार आणि मंडईमध्ये किंमत राहिलेली नाही. गवारीची शेंग मात्र महागाईतही आपली ओळख टिकवून ठेवू पाहात आहे. ८० रुपये किलोदराने ही शेंग बाजारपेठेत उपलब्ध आहे. गवारीबरोबरच शेवगा आणि दोडकाही ८० रुपये किलोप्रमाणे खरेदी क रावा लागत आहे. बाजारपेठेत सध्या गवारी, शेवगा आणि दोडका याशिवाय इतर सर्व भाज्या स्वस्तात मिळू लागल्या आहेत. याचा फटका बीड आणि परिसरातील शेतक-यांना सहन करावा लागत आहे. सर्वसामान्यांसाठी ठसकेबाज ठरणारा लसूणही अतिशय कमी दराने खरेदी केला जात आहे. बाजारपेठेत असलेली मंदी आणि भाज्यांची वाढती आवक यामुळे भाजीपाले स्वस्त झाल्याचे समीर बागवान यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा