कंपनीतील अस्थायी कामगारांना नोकरीत कायम करावे, परिसरातील गावांना दत्तक घेऊन विकास करावा, कामगारांची रोटेशन पद्धत कायमची बंद करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने पांढरपौनी परिसरातील आर्यन व भाटिया कोलवॉशरीजवर शेतकऱ्यांनी मोर्चा काढून धडक दिली.
 या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले. शासन व व्यवस्थापनाने जबाबदारी समजून हे जनहिताचे प्रश्न तातडीने सोडवावे व कृषी खात्याच्या अहवालाप्रमाणे नुकसानीची भरपाई द्यावी, शासन व व्यवस्थापनाने आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड. चटप यांनी दिला.
कोलवॉशरीजच्या धुळीमुळे हवा व पाणी यांचे प्रदूषण होऊन शेतकऱ्यांच्या पिकाच्या उताऱ्यात मोठी घट झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, कोलवॉशरीजचे दूषित पाणी मोठय़ा नाल्यात सोडण्याऐवजी स्वतंत्र विल्हेवाट लावावी, वॉशरीजच्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्र बसवावे, कंपनीच्या आजूबाजूला पांढरपौनी, मुठरा, चंदनवाही, खामोना, अहेरी, पाचगाव, कळमना या गावातील बेरोजगारांना नोकरीत प्राधान्य द्यावे, कंपनीतील सर्व अस्थायी कामगारांना नोकरीत कायम करावे, कंपनीतील कामगारांना वैद्यकीय सुविधेसाठी दवाखाण्याचे पॅनल घोषित करावे, गंभीर दुर्घटनेत मृत्यू झाल्यास कामगारांला दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, कंपनीसमोर वाहने उभे राहिल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून कंपनीने यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, आदी मागण्या शिष्टमंडळाने व्यवस्थापनाकडे केल्या.
 या मोर्चात प्रभाकर दिवे, जिल्हा परिषद सदस्य नीलकंठ कोरांगे, प्रा. अनिल ठाकुरवार, पंचायत समिती सभापती सिंधू बारसिंगे, प्रभाकर   ढवस,    जिल्हा    परिषद    सदस्य भीमराव पुसाम, नरेंद्र काकडे, बंडू कोडापे आदी सहभागी झाले.

Story img Loader