बंधाऱ्यांचे पाणी पेटले
ढालेगाव बंधाऱ्याच्या पाण्यासाठी पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कृषिपंपाची वीज तोडण्यास आलेल्या वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडविण्यासाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले.
कोणत्याही स्थितीत वीज खंडित करू दिली जाणार नाही, असा निर्धार करीत काही रस्त्यांवर खड्डे खोदण्यात आले, तर काही ठिकाणी झाडे तोडून रस्ता बंद केला. दरम्यान, शनिवारी शेतकऱ्यांसह शिवसेनेनेही या प्रश्नावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्यात असलेल्या पाण्याच्या आधारे गोदाकाठावरील रामपुरी, वडी, निवळी, गोपेगाव, मरडसगाव, पाटोदा आदी आठ गावांतील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके घेतली आहेत. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता या बंधाऱ्यातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याने १८ डिसेंबरपासून महसूल प्रशासनाने वीज कंपनीच्या साहाय्याने आठ गावांतील गोदावरी पात्रातील कृषिपंपाची वीज खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार ढालेगाव व रामपुरी येथील सहा रोहित्रांची वीज खंडित करण्यात आली.
५५ शेतकऱ्यांच्या वीजजोड तोडण्यात आले. वीज खंडित केल्यास रब्बी पीक हातचे जाईल, या भीतीने शेतकऱ्यांनी सरकारच्या या निर्णयास विरोध केला.
बुधवारी या भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांची भेट घेतली.
पूर्वसूचना न देता वीजजोड तोडले जात आहेत, याविषयी या भेटीत विचारणा करण्यात आली. परंतु प्रशासनाने गोदावरी पात्रातील उपलब्ध पाणीसाठा हा पिण्यासाठी आरक्षित केल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी देता येणार नाही, अशी भूमिका घेतली, मात्र भेटीत यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी वडी, निवळी, गोपेगाव, मरडसगाव, पाटोदा या गावांतील मुख्य रस्त्यावर जागोजागी रास्ता रोको केले. वडी व निवळी येथे वीज तोडण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना येता येऊ नये म्हणून खड्डे खोदण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी झाडे तोडून रस्त्यावर टाकण्यात आली. बैलगाडीसह शेतकरी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले होते. सायंकाळपर्यंत हे आंदोलन सुरू होते. माकपचे कॉ. दीपक लिपणे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे विजय सीताफळे, शिवसेनेचे मुंजाजी कोल्हे, बाळासाहेब गिराम, माणिक घुमरे, कल्याण गिराम आदी या आंदोलनात सहभागी झाले. शनिवारी शेतकऱ्यांसह शिवसेनाही याच प्रश्नावर ढालेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.     

Story img Loader