यंदा पाऊस चांगला होत असून पिकेही जोमदार असली, तरी रानडुकरे, हरिण, मोर या प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहेत.
जिल्हय़ात हरिण व मोरांकडून शेतातील पिकांची नासाडी होत असली, तरी वन्य पशु कायद्यामुळे शेतकऱ्यांना या प्राण्यांना अटकाव करणे अवघड झाले आहे. वन विभागाच्या वतीने निधीचे कारण सांगत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. परिणामी पाखरांपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांना जशी काळजी घ्यावी लागत होती, तशी प्राण्यांपासून संरक्षणासाठी घ्यावी लागत आहे. पाखरांपासून रात्रीच्या वेळी त्रास होत नसे, मात्र हरिण व मोरांचा त्रास रात्रीही सुरू असल्यामुळे त्याला प्रतिबंध कसा करायचा? याबाबत शेतकरी चिंतेत आहेत.
सध्या रानडुकरांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यांना मारण्यासाठी वन विभागामार्फत परवानगी असल्याचे सांगितले जात असले, तरी रानडुकरांचा बंदोबस्त कसा करायचा, ही शेतकऱ्यांपुढील मोठी समस्या आहे. शेताच्या भोवती अशा प्राण्यांपासून प्रतिबंध करण्यासाठी महागडी रासायनिक औषधे बाजारात उपलब्ध आहेत, मात्र भीज पावसामुळे या औषधांची मात्राही लागू होत नाही. काही गावांत शेतकऱ्यांनी वीज मंडळाच्या तारेवर आकडे टाकून तारेत वीजप्रवाह सोडण्यास सुरुवात केली आहे. परंतु अशा उपाययोजनांमुळे काही ठिकाणी प्राण्यांच्या जीवितावर बेतण्याचे प्रकारही घडत आहेत. प्रशासन अशा छोटय़ा बाबींकडे लक्ष देत नसल्यामुळे समस्यांचे रूप तीव्र होत आहे.