कराड तालुक्यात खरीप हंगामातील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र ७३ हजार हेक्टर असले तरी आजवर सुमारे ६६ ते ७० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिके घेतली गेली आहेत. तालुक्याच्या दक्षिण व उत्तर विभागातील डोंगरी व दुर्गम भागात मान्सूनपूर्व कोसळलेल्या मान्सूनपूर्व वळीव पावसानंतर शेतीच्या मशागतींनी गती घेतली. बहुतांश क्षेत्रावर मशागती पूर्ण होऊन धूळवाफ पेरणीची कामे हाती घेतली जात आहेत. काही ठिकाणी ही कामे अंतिम टप्प्यात पोहचली आहेत. तालुक्याच्या बहुतांश विभागात मान्सूनपूर्व वळीव पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरट केलेल्या जमिनीची कुळवट, फणपाळी, सड वेचणे, काटेकुटे जाळून साफसफाईची कामे कंबर कसून गतीने सुरू केली आहेत. आजही काही भागात बैलांच्या साहायाने शेतीच्या मशागतीची कामे केली जात आहेत, तर आर्थिकदृष्टय़ा सधन पट्टय़ात प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मशागती काम सुरू आहे.
तालुक्यात खरीप हंगामासाठी लागणारा बियाणांचा मुबलक साठा उपलब्ध झाला असून, त्यामध्ये भात इंद्रायणी, बासुमती, फुले समृध्दीसह १७ वाणांच्या बियाणांची १०९५ क्विंटल मागणी होती. त्यापैकी ७०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. खरीप ज्वारीमध्ये महाबीज नं. ७, ९, महिको ५१, भाग्यलक्ष्मी, भुईमूगमध्ये जेएल-२४, टीजी-२६ जेएल २८६, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल बियाणे मुबलक व आवश्यकतेइतके उपलब्ध झाले आहे. त्याचा तुटवडा भासणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील राहिले आहेत. याचबरोबर रासायनिक खतांचाही मुबलक साठा उपलब्ध झाला असून, खतांच्या किमती कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामासाठी रासायनिक खते खरेदी करताना किमती तपासून खरेदी करावी अन्यथा खत विक्रेत्याकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना गावोगावी कळविण्यात आले आहे.
बळीराजा मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसला आहे. यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पाश्र्वभूमीवर शेतकरीवर्ग उत्साहात शेतकामात स्वत:ला झोकून देत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. शुगर बेल्ट म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या या तालुक्यात यंदा उसाचे पीक विक्रमी नोंदले जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
सातारा जिल्ह्यातील भौगालिकदृष्टय़ा आणि लोकसंख्येने बलाढय़ असलेल्या कराड तालुक्याकडून शासनाला विक्रमी महसूल मिळत आहे. तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ४ हजार २११ हेक्टर असून, त्यापैकी लागवडीखाली ८६ हजार २४० हेक्टर क्षेत्र येते. तालुक्यातून दोन मुख्य आणि ४ उपनदय़ांसह कृष्णा डावा, उजवा आणि आरफळ कालवा वाहात असल्याने हा तालुका पूर्णत: बागायत असत्याचे जरी मानले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र, रब्बी हंगामाचे ४० हजार २७६ हेक्टर आणि उन्हाळी हंगामाचे सर्वसाधारण ७० हेक्टर क्षेत्र बागायती झाले आहे. पाणी योजनांवर तुलनेत केवळ २० टक्के क्षेत्रच बागायती झाले असून, उर्वरित क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे आजही तालुक्यातील अनेक गावांना उन्हाळय़ात पिण्याच्या पाण्याची चणचण भासते.
कराड तालुक्यातून कृष्णा आणि कोयना व मुख्य नद्यांसह तारळी, दक्षिणमांड, उत्तरमांड आणि वांग या उपनद्या वाहात आहेत. एकूण १ लाख ४ हजार २११ हेक्टर क्षेत्रापैकी ७३ हजार २५१ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगाम घेतला जातो. तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान ६१० ते ७५० मिलिमीटर इतके राहिले आहे. तालुक्यात मुलकी गावांची संख्या २१९ आणि १९८ ग्रामपंचायती व १३६ विकास सेवा सोसायटय़ा आहेत. तालुका लोकसंख्येने आणि जमिनीच्या बाबतीत मोठा असला तरी १ लाख १ हजार ३०१ इतके शेतकरी कुटुंबे अल्प भूधारक, १८ हजार ८४० लहान शेतकरी असून, दोन ते चार हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५ हजार २३८, चार ते १० हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १००६ आणि १० ते २० हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७६ इतकी आहे. या शेतकऱ्यांकडून खरीप आणि रब्बी हंगामात खरीप ज्वारी, भात, भुईमूग, सोयाबीन, मका, तूर, कारळा, नाचणी, बाजरी, सूर्यफूल, करडई, उडीद, मूग ही पिके घेतली जातात. बागायती क्षेत्रात ऊस, हळद, आले टोमॅटो केळी, द्राक्षे अशी जवळपास १८ ते २० प्रकारची पिके घेतली जातात.

Story img Loader