तालुक्याच्या दक्षिण पट्टय़ातील सांगवीभूसार, धामोरी, मुखेड या परिसराला अवकाळी गारांच्या पावसांचे शनिवारी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान झोडपून काढले, त्यामुळे उसाचे पीक झाडणींच्या फडासारखे झाले, द्राक्षबागांचे मणि गळून पडले, कांदा, गहू, घास, फळबाग आदी कोटय़ावधी रुपये किंमतीचे पीक मातीमोल झाली. उभ्या पिकाकडे आशेने पहात असलेल्या शेतकऱ्याच्या नशिबावर पावसाचा वरवंटा फिरला.
सभापती मच्छिंद्र केकाण, जिल्हा परिषदेच्या सदस्या  नंदा भिमराव भूसे, पंचायत समिती सदस्या वैशाली साळुंके, सुनील देवकर, कृषी अधिकारी, तलाठी आदींनी रविवारी पीक नुकसानीची पाहणी केली. तत्पुर्वी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन विपीन कोल्हे यांनी प्रशासनाबरोबर चर्चा केली व त्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. सांगवीभूसार, धामोरी, मुखेड या परिसराला यापूर्वीही १४ फेब्रुवारी २०१३ त्याहीआधी ११ नोव्हेंबर २००९ रोजी फयान वादळाचा तडाखा व १७ डिसेंबर २००९ ला पुन्हा अशा तीन टप्प्यात गारा व अवकाळी वादळीवारा पावसाने झोडपून काढून कोटय़वधी रुपयांचे नुकसान केलेले आहे.
सांगवीभूसारचे शेतकरी सुनिल जयराम शिंदे यांच्या शेतात कांदा, गहू, ऊस पिकांत व छतावर अर्धा ते एक फुट गारांचा खच पडला होता. त्यामुळे तोडणीस आलेल्या उसाचे झाडणीच्या फडात रूपांतर झाले, कांद्याच्या पातीने माना टाकल्या, घासाच्या काडय़ा झाल्या, उन्हाळ्यासाठी जनावरांचा खास मेनू म्हणून कुटी करून ठेवलेल्या वैरणींचा गारा व पावसाच्या पाण्याने भिजून प्रचंड वास सुटला होता. काढणीस आलेल्या गव्हाच्या ओंब्या शेतात अस्तवस्त पडल्या. बिच्चुनाना गोविंद जाधव, सोपान दादा बगाटे, आण्णासाहेब गयाजी जाधव, रंगनाथ बगाटे, नाना आबाजी बगाटे, भाऊसाहेब अबाजी शिंदे, किरण व जनार्दन बाळासाहेब जाधव, गणपत घोटेकर, मुखेडचे संभाजी आहेर व अन्य अनेक शेतकऱ्यांचे गहू, कांदा, घास, द्राक्ष पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
वीजेचा प्रचंड कडकडाट, गारांचा प्रचंड पाऊस, वादळी वारा या तीन संकटाचे वार झेलीत या परिसरातील ऊस तोडणी कामगार रात्रभर थंडीत कुडकूडत होते. त्यांच्या तात्पुरत्या निवासाची ठिकाणे तर अस्तव्यस्त झाली होती. टाकळी, धामोरी, खंदे, धामोरी या गावांचे रस्त्याच्या कडेचे बहुतांश झाडे उन्मळून पडली. आमचे नुकसान झाले, आता आम्ही पहायचे कुणाकडे आणि आमचा संसार प्रपंच चालवायचा कसा? असा आर्त सवाल गारपीटग्रस्त शेतकरी विचारत होते.
नशीब फुटले
धामोरी शिवारातील ज्ञानेश्वर रंगनाथ वाघ यांचा तीन एकर द्राक्ष बाग काढणीस आला होता. मात्र निसर्गाच्या अवकाळी गारांच्या तडाख्याने त्याचे क्षणार्धात पाणी पाणी झाले सर्व मणी फुटले, बाग अस्तव्यस्त झाली. नशीबच फुटले अशी वैफल्यपुर्ण भावना त्यांनी व्यक्त केली.
शासनाने या शेतकऱ्यांना तसेच १४ फेब्रुवारी २०१३ रोजी अवकाळी झालेल्या पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना निकष बदलून नुकसान भरपाई द्यावी. फळबाग द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत द्यावी अशी मागणी आमदार अशोक काळे व प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव बिपीनदादा कोल्हे  यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल तसेच पुनर्वसन मंत्र्यांकडे केली आहे.

Story img Loader