कृषिपंपांची वाढीव वीजदर आकारणी रद्द करावी, या मागणीसाठी गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. या दोन्ही कार्यालयाच्या ठिकाणी जोरदार निदर्शने करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. असा निर्णय घेत नाही तोपर्यंत शेतकरी वीज बिले भरणार नाहीत, असा निर्धार या वेळी करण्यात आला. महाराष्ट्र राज्य एरिगेशन फेडरेशनच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील शेतक ऱ्यांना यापूर्वी ठरावीक आकारामध्ये वीजपुरवठा केला जात होता. त्यासाठी ५००, ७०० व ९०० रुपये प्रमाणे वीज बिल आकारले जात होते. त्यामध्ये इंधन कर वा अन्य करांचा समावेश नव्हता.
अलीकडे मात्र महावितरणने मीटर रिडींगनुसार वीज आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे शेतक ऱ्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक भरुदड बसत आहे. शिवाय मीटर रिडींगची आकारणीची पद्धत अक्षिशित शेतक ऱ्यांना समजत नसल्याने त्यांचा गोंधळ  होत आहे. या बिलांमध्ये वेगवेगळे कर आकारले जात असल्याने शेतकरी गोंधळून गेला आहे.    
या सर्व तक्रारीसंदर्भात ऑक्टोबर महिन्यात ऊर्जामंत्री राजेश टोपे यांच्याशी राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने चर्चा करण्यात आली होती. तेव्हा ऊर्जामंत्र्यांनी यामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. तेअद्याप न पाळल्याने शेतक ऱ्यांनी आज मोर्चा काढला.    
दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. सुमारे २ हजारावर शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी राजाराम माने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानंतर ताराबाई पार्कातील महावितरणच्या कार्यालयासमोर मोर्चा पोहोचला. तेथेही जोरदार निदर्शने करण्यात आली. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी आंदोलकांची भूमिका स्पष्ट करून पूर्वीप्रमाणे वीज आकारणी व्हावी, अशी मागणी केली. मीटर रिडींगप्रमाणे बिले आल्यास ती भरली जाणार नाहीत, असा निर्धार करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व फेडरेशनचे अध्यक्ष अशोक पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, माजी आमदार संजय घाटगे, आर.के.पाटील, सखाराम चव्हाण, सचिन पाटील, एस.एस.पाटील, एस.ए.कुलकर्णी, वामनराव साळोखे, टी.डी.पाटील, आर.के.तांबे आदींनी केले. अशाच प्रकारचे आंदोलन सांगली, सातारा व पुणे येथेही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

Story img Loader