तालुक्यातील रब्बीच्या पिकांची आणेवारी जाहीर करण्यात आली असून ८८ ग्रामपंचायतींच्या अधिपत्त्याखालील १०० गावांतील आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. अक्कलवाडी व भोंद्रे येथील २३, वेसदरे २४ तर पारनेरसह २२ गावांची आणेवारी २५ पैसे आहे. उर्वरीत गावांची आणेवारी ३० ते ४५ पैशांच्या दरम्यान असल्याचे तहसिलदारांनी जाहीर केले. दरम्यान या आणेवारीची दखल घेऊन शासनाने तालुक्याला दुष्काळ निवारणासाठी मोठा निधी द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूल झावरे यांनी केली आहे.
कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांची आणेवारीही ४० ते ४५ पैशांदरम्यान असून संपूर्ण तालुक्यात रब्बीच्या पिकांची स्थिती गंभीर स्वरूपाची आहे. मागील वर्षी दुष्काळ निवारणासाठी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यात साखळी पद्घतीच्या बंधाऱ्यांसाठी सुमारे १७ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचे सांगून झावरे म्हणाले, या बंधाऱ्यांची कामे मार्चअखेर कामे पुर्ण होतील. या बंधाऱ्यांमुळे सिंचन होऊन दुष्काळ निवारणासाठी हातभार लागणार आहे. ही योजना तालुक्यातील साठ गावांमध्ये राबविण्यात येत असून उर्वरीत गावांमध्येही अशाच प्रकारच्या बंधाऱ्यांची अवश्यकता असल्याने तेथेही निधी मिळवा यासाठी आपण प्रयत्न सुरू आहेत. आणेवारी जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील दुष्काळाची भीषण दुष्काळाचे वास्तव पुढे आले असले तरी तालुक्यात अजुनही जनावरांसाठी छावणीही सुरू झालेली नाही, याउलट कुकडी कालव्याचा सर्वाधिक लाभ घेणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यात काही महिन्यांपुर्वीच छावण्या सुरू झाल्या आहेत. दुष्काळातही असा भेदभाव का असा सवालही त्यांनी करून
यासंदर्भात मुख्यमंत्रयांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.