जिल्ह्य़ात वार्षकि सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस पडल्याने संपूर्ण जिल्ह्य़ात ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. याचा खरीप हंगामाला चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्य़ात ३२ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा नजरपाहणी अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. यात सर्वात जास्त सोयाबीनचे, तर त्यापाठोपाठ कपाशीला फटका बसला आहे.
मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्याने नदीकाठावरील शेतात पाणी शिरल्याने शेतजमिनी खरडून गेल्या. त्यानंतर काही दिवस पावसाने उघाड दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपून घेतली. मात्र, पुन्हा पावसाने आपला रंग दाखवत शेतकऱ्यांना पुरते रडवून सोडले. नदी-नाल्यांना पूर झाल्याने पुराचे पाणी अनेकांच्या शेतात शिरले. शेतजमिनीतून पाणी निघायला जागाच नसल्यामुळे ते तसेच साचून राहिल्याने हजारो हेक्टरला तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र बघावयास मिळाले. सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्जात समाधानकारक साथ दिली, तर राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना विविध कारणे पुढे करून कर्ज देण्यास नापसंती दर्शविली. कर्ज न मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढून पेरणी आटोपून घेतली. मात्र, जमिनीतून निघालेले पीक नाहीसे झाल्याने त्यांच्यासमोर पुन्हा एक नवीन संकट उभे ठाकले आहे.
पावसामुळे जिल्ह्य़ातील जवळपास ८०० गावे बाधित झाली. यात एकूण ३२ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त बाधित गावे आर्णी तालुक्यात ११५ असून ७ हजार २४० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. पुसद तालुक्यातील ६० गावांत ४ हजार २४० हेक्टर, वणी १०५ गावांत ३ हजार ९८६ हेक्टर, घाटंजी ९० गावांत ४ हजार ८८९ हेक्टर, पांढरकवडा ११९ गावे, २ हजार ५२५ हेक्टर, दारव्हा ४६ गावे २ हजार ८६४ हेक्टर, उमरखेड २२ गावांतील २ हजार ९०० हेक्टर, यवतमाळ ५० गावांतील ४४७ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. यात १९ हजार हेक्टरमधील सोयाबीन, तर १० हजार हेक्टरमधील कापूस व इतर पिकांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत असूनही त्यांना ती मिळणार की नाही, याविषयी बोलायला कोणताही अधिकारी तयार नाही. एक-दोन दिवसांची उघाड दिल्यानंतर पाऊस कोसळत असल्याने डवरण, निंदणाची कामे खोळंबली आहेत. पिकांपेक्षा तणच जास्त निघत असल्याने निंदण करायला कठीण जात आहे. तणनाशकाच्या वापराला शेतकरी प्राधान्य देत असले तरी ते फवारल्यानंतर पाऊस झाल्याने तेही प्रभावहीन ठरत आहे.
पीक पाहणीचा अहवाल सादर
सततच्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या वतीने नजरपाहणी करण्यात आली असून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. महसूल विभागाचे अधिकारी पाहणी करून आपला अहवाल सादर करतील. त्यानंतरच शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळू शकते, अशी प्रतिक्रिया जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा