१४ वर्षे शेतकऱ्यांच्या भाळी वनवास
अंबरनाथ तालुका होऊन आता १४ वर्षे झाली तरी कृषी कार्यालय मात्र अद्याप उल्हासनगरमध्येच असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. या तालुक्यात सध्या मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात वेगाने नागरीकरण होत असलेली अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे आहेत. उत्पादन खर्च आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक शेतकरी आता शेती करण्यापेक्षा विस्तारित शहरीकरणासाठी आपली जागा देणे पसंत करू लागले आहेत. नागरीकरणाच्या या रेटय़ातही तालुक्यातील शेकडो शेतकरी अजूनही उत्तम शेतीवर विश्वास ठेवून आहेत. कारण जिल्ह्य़ांतील इतर तालुक्यांच्या तुलनेत अंबरनाथ तालुक्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे.
 कृषी अधिकारी विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार वनसंपदा धरून तालुक्यातील ३३ हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. भात हे या प्रदेशातील मुख्य पीक असून एकूण साडेपाच हेक्टर जमिनीत भातपीक घेतले जाते. रब्बी पीक क्षेत्र त्या तुलनेत अतिशय कमी आहे. साधारण ६५ हेक्टरमध्ये हरबरा तर १५० हेक्टर जागेत भाजीपाला पिकतो. जमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहता तालुक्यात यापेक्षा कितीतरी अधिक पीक घेता येणे शक्य आहे. मात्र कार्यालयच तालुक्यात नसल्याने शेतकऱ्यांना तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधता येत नाही. त्यात या कार्यालयास वाहन नसल्याने अधिकाऱ्यांनाही क्षेत्रभेट देता येत नाही.
अंबरनाथ येथे बहुमजली प्रशासकीय भवन असून तिथे अथवा बदलापूर येथील बेलवली परिसरातही कृषी कार्यालय हलविता येणे सहज शक्य आहे. मात्र शासकीय स्तरावर उदासीनता असल्याने शेतकऱ्यांना नाहक उल्हासनगरला हेलपाटे घालावे लागत आहेत. विशेष म्हणजे उल्हासनगरचे हे कार्यालयही भाडय़ाच्या जागेत आहे.    
सध्या येथील भातपिकाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टर दोन हजार ते दोन हजार ३०० किलो आहे. भाताची सरासरी उत्पादकता वाढून ३ हजार किलो प्रतिहेक्टर व्हावी, यासाठी कृषि कार्यालयाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रत्येकी शंभर हेक्टरचे चार प्रकल्प राबविले जात असून शेतकऱ्यांच्या गटांना सामावून घेण्यात आले आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निसर्ग संवर्धनाच्या हेतूने अंबरनाथ तालुक्यात येत्या महिन्याभरात सव्वा लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या उपसभापती शैला बोराडे यांनी सोमवारी कृषिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिली. तालुक्यात के. टी. बंधारे बांधण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिबिरे घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. शेती विकण्यापेक्षा पिकविण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farming office of ambernath in ulhasnagar