दुष्काळामुळे फार पाणी मिळत नसले तरीही मिठाच्या सहाय्याने शेती करता येणे शक्य असल्याचा दावा प्रगतीशील शेतकरी सबाजीराव गायकवाड यांनी केला आहे. मिठावरची शेती हाच दुष्काळाला चांगला पर्याय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वानुभवावरून हे मत झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याला शास्त्रीय आधार आहे अशी माहिती देऊन त्यांनी सांगितले की मीठ हवेतील आद्र्रता शोषून घेते. त्यानंतर मीठाचे पाणी होते. मीठ टाकलेल्या जमिनीत काही दिवसांनी खोदून पाहिले असताना त्याठिकाणी चिखल व्हावा इतके पाणी दिसते. हे पाणी झाडे बरोबर शोषून घेतात व त्यावर जगतात. त्यामुळे फळबागा तसेच अन्य काही शेतीसाठी पाण्याची विशेष गरज नाही. केवळ मीठाचा वापर करून ही शेती करता येते, ज्यांना याविषयी उत्सुकता असेल त्यांनी रूईछत्रपती, ता. पारनेर येथील संत्र्यांची बाग पहावी, सलग दोन वर्षे पाऊस नसतानाही बागेतील संत्र्याची झाडे जीवंत आहेत असे गायकवाड म्हणाले.
गायकवाड त्यांच्या सोलापूर रस्त्यावरील गायकवाड फार्म येथे दर महिन्याच्या ५ तारखेला मिठावरील शेती या विषयाचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना विनामूल्य देत असतात. मिठामुळे झाडांची किड नष्ट होते, खतांमध्ये असलेले सर्व प्रकारचे क्षार मिठात असल्याने त्याचा खत म्हणूनही वापर होतो. मीठ टाकलेल्या शेतातील माती सतत साफ करत राहिल्याने मिठाचे कण सुर्यकिरणांबरोबर हवेच्या पोकळीत साधारण २०० फूट उंचीवर स्थिर राहतात, त्यामुळे पाऊस पडण्यास मदत होते, हे शास्त्रीय सत्य आहे व ते डॉ. मराठे यांच्या वरूणयंत्र संशोधनातून सिद्ध झाले आहे असा दावा गायकवाड यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा