महाराष्ट्र शासनाचा कृषी व पणन विभाग आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने येथे १६ व १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर पूर्व संमेलन म्हणून कृषी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पंचवटीतील के. के. वाघ कृषी व संलग्न महाविद्यालयात शुक्रवारी कृषी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे अध्यक्षस्थान महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे हे भूषविणार आहेत. स्वागताध्यक्ष क. का. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ हे आहेत. संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे, क. का. वाघ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष काशिनाथदादा टर्ले, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शिक्षण विस्तार संचालक हरिभाऊ मोरे हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनात वाघ शिक्षण संस्थेच्या कृषी आणि संलग्न महाविद्यालय तसेच कर्मयोगी दु. सि. पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. निबंध व वादविवाद स्पर्धा हे संमेलन पूर्व उपक्रम तर प्रत्यक्ष संमेलनात परिसंवाद आणि कवी संमेलन असे उपक्रम होणार आहेत.
परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. मोरे तर कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कविवर्य संजय चौधरी असतील. पूर्व सत्रात ग्रंथ दिंडी, उद्घाटन, परिसंवाद तर दुसऱ्या सत्रात कवी संमेलनातील विजेत्यांचा गौरव असे कार्यक्रम होतील. संमेलनास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष आयोजक अरूण आंधळे आणि पूर्व संमेलन समिती प्रमुख डॉ. कल्याण देवळाणकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९९८७८३३७२ व ८६००४२०१२२ येथे संपर्क साधावा