बनावट कंपनी स्थापन करून व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा घालणारे त्रिकुट खरे तर पोलिसांच्या हाती लागतच नव्हते. पण या कंपूतील एका शौकीन भामटय़ाने आपल्या मोबाईलवरून बारबालेला सतत केलेले फोन त्यांना महागात पडले. त्या बारबालेशी केलेल्या गुजगोष्टींमुळे हे त्रिकुट गजाआड गेले. मुंबईतील एक व्यापारी रमेश शहा यांची ‘त्रिवेदी मेटल सप्लायर्स’ नावाची कंपनी आहे. जुलै महिन्यात ते ‘नोबेल एण्टरप्रायझेस’ या कंपनीच्या संपर्कात आले. या कंपनीचा व्यापारी हितेश मेस्त्री याने शहा यांच्याकडून पावणे दोन लाखांचे तांब्याचे पत्रे आणि पाईप विकत घेतले. त्यावेळी त्याने आपली ओळख अमित त्रिवेदी अशी करून दिली होती. या कंपनीत मेस्त्रीसह मोहन जोशी आणि भावीन मेहता असे अन्य दोन भागीदार होते. सुरुवातीला त्यांनी वेळेवर पैसे देऊन विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्यांनी शहा यांच्याशी व्यवहार सुरू ठेवला होता. चार महिन्यात त्यांनी शहा यांच्याकडून तब्बल ३९ लाख रुपयांचा माल विकत घेतला. पण नंतर या त्रिकुटाचे मोबाईल बंद झाले. शहा यांनी ‘नोबेल एण्टरप्रायजेस’या कंपनीची चौकशी केली तेव्हा अशा प्रकारची कुठलीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहा यांनी व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. शहा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला पण या आरोपींबाबत कसलेच धागेदोरे नव्हते. मुख्य आरोपी हितेश मेस्त्री याच्यासह सगळ्यांचे मोबाईल बंद होते. त्यानंतर पोलिसांनी मेस्त्री याच्या मोबाईलवरून कोणाला फोन जायचे, कोणाचे यायचे याचा तपशील तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका विशिष्ट क्रमांकावर तो सतत फोन करत असल्याचे आढळून आले. हा क्रमांक शोधला असता तो एका बारबालेचा असल्याचे पोलिसांना आढळले. या बारबालेचा पत्ता शोधत पोलिसांनी भाईंदर गाठले. परंतु तिचे घर बंद होते. या बारबालेचा मुलगा एका ठिकाणी रहातो आणि घरकाम करणारी महिला त्याचा सांभाळ करते, अशी माहिती पुढे आली. पोलिसांनी मग शाळेतून माहिती घेऊन या घरकाम करणाऱ्या महिलेला गाठले आणि तिच्यामार्फत बारबालेपर्यंत पोहोचले. या बारबालेने हितेन मेस्त्री आपल्याकडे नियमित यायचा आणि भरपूर पैसे उधळायचा अशी कबुली दिली. पण तो कुठे राहतो याची तिला काहीच कल्पना नव्हती. पण अतिमद्यपान झाल्यावर काही वेळा हॉटेलचा एक वेटर त्याला घरी सोडत असे अशी माहिती तिने दिली. यानंतर पोलिसांनी या वेटरची चौकशी करून त्याच्याकडून मेस्त्रीचा पत्ता घेतला. तो भाईंदरलाच राहणारा निघाला. पोलिसांनी मेस्त्रीला अटक केली आणि नंतर त्याच्या दोन्ही साथीदारांनाही अटक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा