जनलोकपाल विधेयक मंजूर करावे या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दी येथे सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी येथील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उपोषण केले. उपरोक्त विधेयक मंजूर करुन हजारे यांचे प्राण वाचवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी जनलोकपाल विधेयक अनिवार्य आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी दोन वर्षांपासून अण्णा हजारे अहिंसक मार्गाने सत्याग्रह, उपोषण व आंदोलन करत आहे. जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याची केंद्र शासनाने लेखी पत्राद्वारे आश्वासने दिली आहेत. विरोधी पक्षांनी त्यास पाठिंबा देण्याचे जाहीर केले.
तथापि, प्रत्यक्षात सर्वच राजकीय पक्षांकडून फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दी येथे ‘करेंगे या मरेंगे’ या निर्धाराने उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जनतंत्र मोर्चा तथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर, राजेंद्र नानकर, हेमंत कवडे, संजय करंजकर आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिकांनी अण्णांच्या आंदोलनास पाठिंबा दिला पाहिजे. राष्ट्रभक्तीच्या भावनेने आंदोलनात सहभागी होऊन दबावगट निर्माण करावा, असे आवाहन आंदोलकांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा