सायन-पनवेल मार्गावरील खारघरच्या प्रवेशद्वारावर भुयारी मार्गासाठी केलेले खोदकाम हे कालपर्यंत वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र गुरुवारी या खोदकामातील खड्डय़ात एक मृतदेह सापडल्याने हा खड्डा जीवघेणा ठरत असल्याचे बोलले जात आहे. अनेक महिन्यांपासून हे खोदकाम करूनही खारघरचा भुयारी मार्ग पूर्ण होण्याचे नाव घेत नाही, मात्र हा खड्डा रहिवाशांसाठी सर्वार्थाने धोकादायक बनू पाहात आहे.
एसटीने गुरुवारी दुपारी एक वाजता प्रवास करणाऱ्या प्रवासीला या खड्डय़ामधील पाण्यावर तरंगणारा मृतदेह दिसला. संबंधित जागरूक प्रवाशांने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.
साडेतीन वाजता पोलिसांनी अग्निशमन दलाच्या साहाय्याने हा मृतदेह पाण्याबाहेर काढून तो विच्छेदनासाठी पनवेल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. ही व्यक्ती कोण याचा शोध पोलिसांना अद्याप लागलेला नाही. अंदाजे ५५ ते ६० वर्षांचा हा पुरुष असल्याची माहिती खारघर पोलिसांनी दिली. खारघरच्या भुयारी मार्गासाठी कंत्राटदाराने अनेक महिन्यांपासून खोदकाम करून ठेवल्याने रोज सायंकाळी वसाहतीमध्ये प्रवेश करताना वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागतो. गुरुवारच्या घटनेनंतरही कंत्राटदाराला खारघरवासीयांच्या सुरक्षेचे काही सोयरसुतक उरलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा बोध अद्यापही कंत्राटदाराने घेतलेला नाही.