नांदेडपासून २० किलोमीटर अंतरावरील ढोकी गावालगत रविवारी रात्री बेछूट गोळीबारात लबडे पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. गोळीबार कोणी व कशासाठी केला, याचे गूढ अजून उकलले नाही. गोळीबारातील जखमी दोघांपकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
नांदेड-नाळेश्वर रस्त्यावर असलेल्या ढोकी येथील गंगाधर मारोतराव लबडे (५५) व त्यांचा मुलगा संदीप (२४) हे दोघे नांदेडहून गावी परतत होते. साधारणत: ७०० लोकवस्तीच्या या गावात गट-तट किंवा कोणताही वाद नाही. लबडे पिता-पुत्र रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरी परतत असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या तीन ते चार युवकांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. मोटारसायकल चालवत असलेल्या संदीपला पहिली गोळी लागल्यानंतर त्याने धाडसाने मोटारसायकल न थांबवता पुढे नेली. त्यामुळे हल्लेखोरांनी मागच्या बाजूने गोळीबार केला. त्यात गंगाधर लबडे यांच्या पाठीत तीन गोळय़ा लागल्या, तर संदीपला एक गोळी लागली. गोळीबाराच्या आवाजाने गावातील काहींनी धाव घेतली, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. जखमी लबडे पिता-पुत्रांना नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संदीपची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी तीन वेगवेगळय़ा शत्रक्रिया कराव्या लागल्याने गंगाधर लबडे यांची प्रकृती मात्र चिंताजनक आहे. या प्रकरणी िलबगाव पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या हल्ल्यामागचे कारण मात्र अजून स्पष्ट होऊ शकले नाही. दरोडय़ाच्या उद्देशाने हा हल्ला नसावा, असा अंदाज अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी व्यक्त केला. कारण लबडे यांच्याजवळील रोख रक्कम किंवा चनीच्या वस्तू पळवण्याचा प्रयत्न झाला नाही. शिवाय दरोडय़ाच्या प्रयत्नात मोटारसायकल अडवण्यात येते, असेही येथे घडले नाही. लबडे कुटुंबीयांचा गावात कोणाशी वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हल्ल्यात जखमी झालेला संदीप मुंबईत नोकरी करतो. त्यामुळे आम्ही सर्वच बाजूंनी तपास करीत आहोत. हल्लेखोर मोटारसायकलवर आले होते. आम्ही नाकाबंदी केली होती, पण ते पसार झाले. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर पडेल व आरोपी जेरबंद होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader