तिसरीही मुलगीच झाल्याचा राग मनात ठेवून दीड वर्षांच्या चिमुरडीचे तोंड उशीने दाबून तिची हत्या केल्याप्रकरणी अक्कलकोट येथील संतोष गवंडी याला कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यानेच मुलीचा खून केल्याचे सिद्ध करणारा ठोस पुरावा पोलिसांनी सादर केलेला नाही असे नमूद करीत मुंबई उच्च न्यायालयाने गवंडीला संशयाचा फायदा देत त्याची जन्मठेप रद्द केली.
सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार, २००० मध्ये गवंडीचे लग्न झाले. तिसरी मुलगी आरतीचा जन्म होईपर्यंत गवंडी पत्नीशी चांगल्या प्रकारे वागत होता. मात्र आरतीचा जन्म झाल्यानंतर गवंडीची पत्नीप्रतीची वागणूक बदलली. ३० ऑगस्ट २००८ रोजी गवंडीने मुलगी झाल्याचा राग म्हणून आरतीच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली. घटनेच्या वेळी पत्नी काही कारणास्तव बाहेर गेली होती, तर त्यांच्या दोन मोठय़ा मुली अंजली आणि मंजली दोघीही घरी होत्या. दीड वर्षांच्या आरतीचा मृत्यू श्वसनक्रिया बंद पडल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. त्यातच गवंडीने आरतीचे उशीने तोंड दाबले होते, अशी माहिती सहा वर्षांच्या अंजलीने दिली होती. न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने या घटनेची एकमेव साक्षीदार असलेली अंजली हिच्याव्यतिरिक्त अन्य कुठलाही साक्षीदार वा ठोस पुरावा सरकारी पक्षाने सादर केलेला नाही, असे निकाल देताना नमूद केले. उलटतपासणीच्या वेळी अंजलीने, ही घटना घडली तेव्हा गवंडी घरी नव्हता आणि ती मंजलीसह घराबाहेर खेळत होती असे सांगितले होते हेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
शिवाय वैद्यकीय अहवालही न्यायालयाने गवंडी याची जन्मठेप रद्द करताना प्रामुख्याने विचारात घेतला. आरतीचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरने आरतीचा मृत्यू श्वसनक्रिया थांबल्याने झाल्याचे सांगताना श्वसनक्रिया अपघातानेही थांबू शकते असे सांगितले होते. आरती झोपलेली असताना तिच्यावर डोक्यापर्यंत पांघरूण घालण्यात आले असावे आणि त्यामुळेच गुदमरून तिची श्वसनक्रिया थांबली असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती.

Story img Loader