नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलिमनगर परिसरात मुलीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पित्याची त्याच्या घरात शिरून मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. सार्वजनिक नळावर झालेल्या भांडणानंतर हा हल्ला करण्यात आला. शेख रमजू शेख जफूर (५५) असे मृताचे नाव आहे. आपल्या वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात शेख रमजू यांची दोन मुले जखमी झाली. या घटनेमुळे अलिमनगरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी मोहम्मद आबिद खाँ आदिल खाँ (२४) याच्यासह दोन जणांना अटक केली आहे.
अलिमनगर परिसरातील एका सार्वजनिक नळावर मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आरोपी मोहम्मद आबिद खाँ याच्या कुटुंबातील महिला पाणी भरत होत्या. मोहम्मद आबिद खाँ याने शेख रमजू यांच्या मुलीची छेड काढल्याने त्याविषयी आबिद खाँ याच्या कुटुंबातील महिलांना त्यांनी जाब विचारला. यावेळी त्यांच्यात वाद झाला. याची माहिती या महिलांनी मोहम्मद आबिदला दिली. काही वेळानंतर मोहम्मद आबिद खाँ आणि त्याचा भाऊ मोहम्मद अफरोज खाँ यांनी शेख रमजू यांच्या घरावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी शेख रमजू यांच्या पोटात चाकूने वार केले. यावेळी शेख रमजू यांना वाचवण्यासाठी त्यांची मुले शेख निसार (३२) आणि शेख इरफान (१८) हे धावून आले. त्यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला. त्यात ते जखमी झाले. आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाल. त्यानंतर हल्लेखारे पळून गेले.
आरोपी मोहम्मद आबिद खाँ हा शेख रमजू यांच्या घराजवळच राहतो. परिसरातील नागरिकांनी नागपुरी गेट पोलिसांना या घटनेची माहिती दिली. शेख रमजू यांच्या पत्नी रझिया बानो यांच्या तक्रारीच्या आधारे नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी आबिद खाँ, अफरोज खाँ या दोन भावांसह तमिजा बी आदिल खाँ यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहे. पोलिसांनी रात्रीच तिघांना अटक केली.
दरम्यान, सार्वजनिक नळावरील अन्य एका भांडणात अचलपूर येथील बिलनपुरा भागात आरोपींनी एका इसमाच्या डोक्यावर विट मारून त्याला जखमी केले. मंगळवारी रात्री ही घटना घडली.
अचलपुरातील बिलनपुरा परिसरातील सार्वजनिक नळावर याच भागातील रहिवासी गजानन काळे (३५) हा पाणी भरत असताना शेजारीच राहणाऱ्या नितेश बंड आणि अन्य दोघांसोबत त्याचा वाद झाला. भांडणात प्रचंड शिविगाळ करण्यात आली. आरोपी नितेश बंड याने गजानन काळे याच्या डोक्यावर विट मारली, त्यात गजानन हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गजानन काळे याच्या तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी आरोनी नितेश बंड आणि अन्य दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.