डोंगरदऱ्यातून जाणारा, अवघड वळणांचा, जीव घेण्यास चढ उताराचा गावाकडे जाणारा रस्ता झाला आणि स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनी एक दुर्लक्षित दूर्गम आदिवासी खेडं दुनियेशी जोडलं गेलं. या रस्त्याच्या जन्मदात्याला त्या गावाला भेटण्याची ओढ होती. गावकरीही त्याच्या स्वागतासाठी आतुरलेले होते. अखेर सात वर्षांनंतर तो योग जुळून आला.
मोठय़ा उत्साहाने गावकऱ्यांनी त्या ‘जन्मदात्या’ अधिकाऱ्याचे स्वागत केले. गावाच्या वेशीवरुन त्याच रस्त्याने वाजतगाजत त्याची
मिरवणुकही काढली. मानपत्र देऊन या विशेष कामगिरीबद्दलची आपली कृतज्ञताही व्यक्त केली. गावकऱ्यांचे हे अलोट प्रेम पाहन तो अधिकारी भारावून गेला.
फोफसंडी हे अकोले तालुक्यातील एक दूर्गम आदिवासी खेडे. चारही बाजुंनी डोंगररांगांनी वेढलेले. जन्मापासूनच रस्त्याअभावी जगापासून तुटलेले. कालपरवापर्यंत कोतूळला बाजारहटासाठी यायचे तर दहा बारा किलोमीटरची पायपीट करावी लागायची. गावाला रस्ता व्हावा ही अनेक वर्षांची मागणी ती या ना त्या कारणाने दुर्लक्षित राहिली. धनंजय धवड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता पदाची (नाशिक) सुत्रे स्वीकारली. फोफसंडीकरांची कथा त्यांच्यापर्यत पोहचली. सारा व्याप सांभाळताना सवड काढून एक दिवस ते प्रत्यक्ष पाहणी करायला या परिसरात दाखल झाले. रस्ता नसल्याने फोफसंडीत ते जाऊ शकले नाही. पळसुंदे गावाजवळच्या बहिरोबापासूनच स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना दुरवर डोंगरदऱ्यात पहुडलेल्या फोफसंडीचे स्थान दाखवले. काहीही झाले तरी हा रस्ता करायचाच असा निर्धार त्यांनी तिथेच व्यक्त केला. नाशिकला गेल्यानंतर सर्व तांत्रिक अडचणी दूर करुन रस्त्याला मंजुरी दिली. अवघ्या महिनाभरात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही झाले. लगेचच कामाला सुरुवातही झाली. तीन साडेतीन वर्षांत रस्ता तयार झाला. चौथ्या वर्षी म्हणजे २०१० मध्ये या रस्त्यावरुन प्रथमच एसटीची मिनीबस गावात आली आणि फोफसंडीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले.
फोफसंडीला भेट द्यायची अतीव इच्छा धवड यांच्या मनात होती पण वेळेचे गणित जुळून येत नव्हते. दरम्यानच्या काळात पदोन्नती मिळून ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव झाले आणि मुंबईला गेले. ३० एप्रिल २०१२ रोजी सचिव पदावरुन ते सेवानिवृत्त झाले. फोफसंडीच्या ग्रामस्थांनी मुंबईत जाऊन श्री. धवड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजीत निरोप समारंभास हजेरी लावली, त्यांचा सत्कार केला आणि त्यांना फोफसंडी भेटीची आठवण करुन दिली. या, ना त्या कारणाने लांबलेली धवड यांची फोफसंडी भेट त्यांच्या निवृत्तीनंतर काल (गुरूवार) घडून आली.
अधिकाऱ्यांसमवेत धवड फोफसंडीत दाखल झाले. गावाच्या सीमेवरच गावकऱ्यांनी ढोलताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले. सजवलेल्या ट्रॅक्टरवर बसून त्यांना मिरवीत गावात नेले. गावातील लहान मुले, महिलाही या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. हनुमान मंदिरात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात धवड यांचा गावकऱ्यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने यावेळी त्यांना त्यांनी केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करणारे मानपत्रही देण्यात आले. स्वागत सुत्रसंचालन करणाऱ्या वयोवृध्द घोडे गुरुजींनी धवड यांच्याविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करताना स्वरचित कविता सादर केली. गावाच्या पुर्वीच्या अवस्थेचे वर्णन करताना या रस्त्यामुळे गावाला ओळख मिळाल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
कार्यकारी अभियंता अनिल रहाणे यांनी रस्त्याच्या मान्यतेपासून निर्मितीपर्यतचा इतिहास कथन केला. या रस्त्याच्या कामाला हातभार लावता आला माझ्या जीवनाचे सार्थक झाले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नोकरीच्या कार्यकाळात असंख्य रस्ते केले, हजारो खेडी जोडली परंतु फोफसंडीचा हा रस्ता आपल्या हृदयात सतत राहील असा आहे. ३५ वर्षांच्या सेवाकाळात फोफसंडीकरांनी दाखवले असे प्रेम आपल्याला कधीही अनुभवयास मिळाले नाही असे भावनिक उद्गार धवड यांनी काढले. आपण केवळ निमीत्तमात्र असे सांगून रस्त्याच्या कामाचे श्रेय त्यांनी सहकाऱ्यांना देताना कार्यकारी अभियंता
रहाणे, उपअभियंता सुनिल महाले, कनिष्ठ अभियंता बी. एस. बनकर आणि रस्त्याचे ठेकेदार राईट कनस्ट्रक्शन यांचा आवर्जुन उल्लेख केला. माजी सरपंच पांडुरंग कचरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. शांताराम गजे यांनी मानपत्राचे वाचन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता हरिश पाटील, कार्यकारी अभियंता सुनिल लोळगे, उपअभियंता आर. व्ही. चव्हाण, भाऊसाहेब खेमनर आदी उपस्थित होते.

Story img Loader