मुलाचा मृत्यू
सात वर्षांच्या मुलाला कीटकनाशक पाजून वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये समोर आला आहे. दोघांवरही कंळबोलीमधील एमजीएम रुग्णालयात सात दिवसांपासून उपचार सुरू होते. यातील मुलाचा अखेर रविवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
कामोठे येथे राहणारे रविकांत महादेव वाघमारे (३२) आणि त्यांची पत्नी यांच्यात सातत्याने वाद सुरू होते. अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. दोघेही वेगवेगळे राहत होते. त्यांचा मुलगा निरंजन हा त्यांच्यासोबत राहत होता. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याने दुसरे लग्न करता येत नव्हते. पतपेढीतील अल्पवेतनाची नोकरी सोडल्याने कर्जबाजारी झालेल्या रविकांत याने गावावरून आईचे दागिने आणून गहाण ठेवले होते.
या सर्व परिस्थितीमुळे वैफल्यग्रस्त झालेला रविकांत २१ एप्रिल रोजी निरंजन याच्यासह पनवेल एसटी डेपो येथे आला होता. या वेळी मी तुझा यापुढे संभाळ करू शकत नसल्याचे सांगत रविकांतने सोबत आणलेले कीटकनाशक स्वत: प्याल्यानंतर निरंजनला पाजले. काही वेळातच निरंजन भोवळ येऊन खाली कोसळला. यानंतर रविकांतने निरंजनला घेऊन एमजीएम रुग्णालय गाठले. मात्र रुग्णालयात पोहचल्यानंतर तोही भोवळ येउन कोसळला. त्या दोघांवरही डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते. मात्र २७ एप्रिल रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास निरजंन याचा मृत्यू झाला. यानंतर काही वेळातच रविकांत शुद्धीवर आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
या प्रकरणी रविकांत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप उपचार सुरू असल्याची माहिती तपास अघिकारी पोलीस उपनिरीक्षक राजू बैयकर यांनी दिली. या घटनेपूर्वी त्याने आत्महत्या करत असल्याचे एसएमएस नातेवाईकांना पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलाला कीटकनाशक पाजून वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न
सात वर्षांच्या मुलाला कीटकनाशक पाजून वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये समोर आला आहे. दोघांवरही कंळबोलीमधील एमजीएम रुग्णालयात सात दिवसांपासून उपचार सुरू होते. यातील मुलाचा अखेर रविवारी सकाळी मृत्यू झाला
First published on: 30-04-2014 at 08:34 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father suside after giveing posion to son