‘‘ कवितेच्या मुळाशी असलेली जाणीव स्पष्ट असेलच असे नाही, हे कविता समजून घेताना लक्षात घ्यायला हवे. कविता म्हणजे गणित नव्हे. ज्यातून वेगवेगळे अर्थ निघू शकतील अशी संदिग्धता कवितेत असली, तर तो कमीपणा मुळीच नाही.’’ असे मत ज्येष्ठ समीक्षक प्रा. के. रं. शिरवाडकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पहिल्या दोन दिवसीय समीक्षक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून शिरवाडकर यांनी ‘साहित्य, समाज व संस्कृती’ या विषयावर कवितेच्या संदर्भाने विवेचन केले. तर प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी ‘रूपवादी व सौंदर्यवादी समीक्षा : सामाजिक व सांस्कृतिक संदर्भात’ या विषयावर मार्गदर्शन केले.
शिरवाडकर म्हणाले, ‘‘सुरुवातीस करूणा, दयाशीलता, प्रेम, वैश्विक दृष्टिकोन या गोष्टींना धार्मिक संस्कृतीत स्थान होते. नंतरच्या काळात क्रौर्य, स्वार्थ आणि पाशवी प्रवृत्तींनी धार्मिक संस्कृतीत शिरकाव केला. सोळाव्या शतकापासून धर्माशी बुद्धिवाद व विज्ञान यांचा संघर्ष सुरू झाला व धर्माला उतरती कळा लागली. या सगळ्याचा परिणाम कला व साहित्यात दिसून आला. कवितेत सांस्कृतिक बदलांची सर्वाधिक कल्पना केशवसुतांना होती. जाणिवा आणि भावनांमध्ये बदल झाल्याने कवीच्या मनात जो कल्लोळ उठतो तो केशवसुतांच्या कवितेत दिसतो. निसर्ग आणि ऐहिकता नष्ट झाल्याचे दु:ख त्यांच्या कवितांतून प्रकटते. तर ऐहिक मूल्ये निष्फळ ठरल्याने आलेली निराशा बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांत उमटली. जुनी मूल्ये हद्दपार होत असताना नव्या मूल्यांचा शोध कविता करीत असते.’’
डहाके यांनी सांगितले की, ‘इंग्रजी, अमेरिकन व रशियन समीक्षेत रूपवाद आढळतो. रूप म्हणजे साहित्यकृतीचा ‘फॉर्म’ असे म्हटले जाते. मात्र ‘फॉर्म’ आणि ‘कंटेंट’ अर्थात आशय वेगळे करता येणार नाहीत. त्यामुळे रूप म्हणजे आशय असलेली आकृती. विशिष्ट कलाकृतीकडे लक्ष केंद्रित झालेले असताना त्यासंबंधीच्या इतर संहिता आठवणे ही त्या साहित्यकृतीची समृद्धी असते. साहित्यकृतींना सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ असतात व ते कधीही पुसता येत नाहीत.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा