वार्षिक म्हणजे जून ते ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्य़ात अपेक्षित तुलनेत ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक पाऊस आतापर्यंत दोन महिन्यांत पडला. मागील वर्षी जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत जिल्ह्य़ात सरासरी ३२५ मिमी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी मात्र जून, जुलैतच जिल्ह्य़ात सरासरी ४१९ मिमी पाऊस झाला.
गेल्या वर्षी याच काळात झालेल्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस दुपटीपेक्षा अधिक आहे. मागील दोन्ही वर्षांत जून व जुलैमधील पाऊस १५० मिमीच्या आतच होता. चालू वर्षी आतापर्यंत सर्वाधिक ५१९ मिमी पाऊस जाफराबाद तालुक्यात झाला. त्या खालोखाल ५०७ मिमी नोंद मंठा तालुक्यात झाली. जूनचा तिसरा आठवडा उलटून गेला तरी मंठय़ातील पाऊस अन्य तालुक्यांच्या तुलनेत कमीच होता. परंतु २४ जुलै रोजी झालेल्या दमदार पावसाने मंठय़ात पावसाची आकडेवारी एकदम वाढली. या एकाच दिवसात मंठय़ात १८३.८५ मिमी पावसाची नोंद झाली. या तालुक्यातील महसूल विभागाची ४ मंडळे असून यातील तळणी महसूल मंडळात एकाच दिवशी विक्रमी ३७० मिमी पावसाची नोंद झाली.
जाफराबाद व मंठा वगळता अन्य तालुक्यांतील पाऊस मिमीमध्ये – जालना ५०१.७२, बदनापूर ३१२.६, भोकरदन ३६३.३४, परतूर ५११, अंबड ३८१.८२ व घनसावंगी २५२.८८. जिल्ह्य़ातील ४९ पैकी ४८ महसूल मंडळांत आतापर्यंतच्या अपेक्षित तुलनेत अधिक पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे मंठा, परतूर तालुक्यांतील ३ ते ४ हजार एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तळणीहून लोणारकडे जाणारा रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला. अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप आले. मंठय़ातील तळतोंडी पाझर तलाव फोडून पाणी बाहेर काढल्याने तेथील धोका तूर्त टळला आहे. अनेक ठिकाणी पावसाने शेतजमिनी खरडून गेल्या आहेत.
परतूरमधील निम्न दुधना सिंचन प्रकल्प स्थळावर आतापर्यंत ४५० मिमी पावसाची नोंद झाली. परिसरात जोरदार पावसामुळे २३ जुलैपर्यंत प्रकल्पात १३० दलघमी, म्हणजे साठवण क्षमतेच्या ३७.७४ टक्के साठा झाला. पुढील दोन दिवसांत यात वाढ होऊन तो १४४ दलघमीपर्यंत म्हणजे ४२ टक्क्य़ांपर्यंत झाला.

Story img Loader