साक्री तालुक्यात बिबटय़ाच्या हल्ल्यात
दोन जखमी
साक्री तालुक्यातील जंगल शिवारात बिबटय़ाने चांगलाच धुमाकूळ घातला असून बिबटय़ाच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. बिबटय़ाला पकडण्यासाठी वन विभागाकडून कोणतेच प्रयत्न होत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.
शेवाळी येथे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माजी सरपंच दगाजी साळुंखे (४०) यांच्यावर बिबटय़ाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. शेवाळी शिवारातील सूस धरण परिसरात बिबटय़ाची नर-मादी जोडी वावरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. साक्री तालुक्यातील टेंभे येथील श्रीराम मोरे (२८) यांच्यावरही त्याच दिवशी बिबटय़ाने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मोरे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साक्री तालुक्यातील काटवन जंगल परिसर तसेच धुळे तालुक्यातील देऊर, म्हसदी, चौगाव या भागातील जंगल शिवारात बिबटय़ाचे सतत दर्शन होऊ लागल्याने शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराट आहे. काही दिवसांपूर्वी बिबटय़ाच्या हल्ल्यात एकाला प्राण गमवावे लागले असून बिबटय़ाकडून शेळ्या-मेंढय़ा फस्त होण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा आणून बिबटय़ाला पकडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.

Story img Loader