अजिंठा पर्वतरांगातील मोताळा व बुलढाणा प्रादेशिक वनपरिक्षेत्रासह ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यप्राण्यांना अन्नपाणी नसल्याने ते नागरी वस्त्यांमध्ये उच्छाद मांडत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. चिखली तालुक्यातील किन्होळा शिवारात लांडग्याने अकरा बकऱ्यांची शिकार केली, तर मोताळा तालुक्यातील गोतमारा शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात एक शेतकरी महिला गंभीर जखमी झाली आहे.
चिखली तालुक्यातील किन्होळा शिवारात लांडग्याने दोन शेतकऱ्यांच्या तब्बल ११ बकऱ्यांची शिकार केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. दुष्काळी परिस्थिती आणि अन्नपाण्याच्या तीव्र टंचाईमुळे हिंस्त्र जनावारे आता गावाकडे आणि शेतशिवारात हैदोस घालत आहेत. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून याप्रकरणी पंचनामा केला आहे. शेषराव खरात व बाबुराव सदाशिव बाहेकर यांचे किन्होळा ते धोडप मार्गावर शेत आहे. शेषराव खरात यांनी पंधरा दिवसांपूर्वीच बकऱ्या विकत घेतल्या होत्या. किन्होळा ते धोडप रोडवरील त्यांच्या शेतात या बकऱ्यांसाठी त्यांनी बांधलेल्या गोठय़ात या बकऱ्या होत्या. त्यांच्या ७, तर नजीकच्या बाबुराव बाहेकर यांच्या गोठय़ातील ४ बकऱ्या लांडग्यांनी फस्त केल्या.
दरम्यान, कापूस वेचत असतांना अस्वलाने केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गोतमारा शिवारात एक दिवस अगोदर रविवारी घडली. मोताळा तालुक्यातील गोतमारा येथील सुरेखा लोकचंद चव्हाण (२६) ही महिला तिच्या शेतात एकटीच कापूस वेचण असताना अचानक अस्वलाने तिच्यावर झडप घातली. यात महिलेच्या हातापायाला दुखापत झाली.
आरडाओरड केल्याने बाजूच्या शेतातील युवकांनी धावत येऊन अस्वलाला हुसकावून लावले. त्यामुळे महिला बचावली. जखमी सुरेखा चव्हाण यांना बुलढाणा जिल्हा समान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे. जंगलातील बिबटे, अस्वल, रानडुक्कर, रोही, तडस ही जनावरे आता अन्नपाण्यासाठी नागरी वस्त्यांकडे धाव घेत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

Story img Loader