अंबरनाथ पूर्व विभागातील बी केबिन परिसरात रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गालगत सुरू केलेल्या कामांमुळे नालेसफाई होण्याऐवजी भराव टाकून नालाच बुजविला जाऊन परिसर जलमय होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
विकास आराखडय़ानुसार बी केबिन नाला १५ मीटर रुंद असला तरी प्रत्यक्षात नियमित साफसफाईअभावी त्यात बराच कचरा आणि माती साचली आहे. पूर्वेकडील शिवाजीनगर, वडवली या उंचावरील भागातून पावसाचे पाणी या नाल्यात येते. सध्या प्रशासनातर्फे नालेसफाई सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात रेल्वेचा अतिरिक्त मार्ग टाकण्यासाठी जागेचे सपाटीकरण सुरू असल्याचे दिसून येते. या सपाटीकरणातून निघणारी माती नाल्यातच पडत असून त्यामुळे पावसाळ्यात हा परिसरात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अंबरनाथ रेल्वे स्थानकाचे अधीक्षक जॉय अब्राहम यांनी मात्र नालेसफाईचेच काम सुरू असून नाल्यात पडणारी माती अन्यत्र हलविण्यात येणार असल्याचे सांगितले.
भुयारी मार्गही बुजला
चार दशकांपूर्वी बी केबिन परिसरात रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग होता. दुचाकीस्वार, छोटी वाहने तसेच पादचारी या मार्गाचा वापर करीत होते. कालांतराने आता हा मार्ग बुजला गेला आहे. रेल्वे प्रशासनाने हा भुयारी मार्ग पाण्याचा निचरा होण्यासाठी खुला करावा, अशी सूचना शिवसेना उपशहरप्रमुख निशिकांत राऊत यांनी केली आहे. दरम्यान रेल्वेतर्फे सुरू करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्याचे आदेश संबंधित पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली.

Story img Loader