यवतमाळ जिल्ह्य़ात वणी आणि झरी जामणी तालुक्यात वाघाची दहशत कायम आहे. वाघाने दोन म्हशी आणि एका गाईचा फडशा पाडल्याने नागरिक आणि शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत.
वाघाच्या भीतीपोटी जंगलात जाऊन शेतीची कामे करणे, इंधनासाठी लाकूड आणणे इत्यादी कामे महिलांनी बंद केली असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. उन्हाची काहीली वाढल्याने व जंगलात नदी नाले आटल्याने पाण्यासाठी वाघाची धाव गावाकडे होत आहे. चिचघाट आणि खडकडोहच्या जंगलात नाल्याजवळ वाघ पाहिल्याचे लोक सांगतात. वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने लावलेले पिंजरे वाघाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत दिवसरात्र घालवत आहेत. पण वाघ मात्र पिजऱ्यांना हुलकावणी देत आहे.
खडकडोह येथे दिलीप सरोदे यांच्या दोन म्हशी वाघाने फस्त केल्यानंतर चिचघाट येथील अशोक डुकरे यांच्या गाईची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न तोकडे पडतात काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. वाघाने गुरांवर हल्ला केल्याचे वृत्त समजल्यावर वन विभागाचे अधिकारी पंचनामे करतात आणि वाघाचा बंदोबस्त केल्या जाईल, असे गावकऱ्याना सांगुन निघून जातात. मात्र, वाघाचा बंदोबस्त झाल्याचे दिसून येत नाही. गुरांची शिकार होत असल्याने वाघाची दहशत वाढली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा