ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे यांची पत्नी आणि पक्षाच्या महिला विभागाच्या प्रमुख संघटक सरिता पालांडे यांचा मंगळवारी पहाटे डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याचे वृत्त असून पावसाळी आजारापासून ठाणेकरांची मुक्तता करण्याच्या बाता करणारा आरोग्य विभाग यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे प्रमुख लक्ष्य ठरण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही महिन्यांत ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरात डेंग्यूने आजारी असलेले सुमारे २७ रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत असली तरी डेंगूसदृश तापाने आजारी असलेल्या रुग्णांचा आकडा बराच मोठा असल्याचे बोलले जात आहे. मलेरियाने आजारी असलेल्या रुग्णांची संख्याही मोठी असून या आजारांना अटकाव घालण्यासाठी महापालिकेची यंत्रणा दरवर्षीप्रमाणे यंदाही तोकडी ठरल्याची टीका केली जात आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्र यांनी नागरिकांनीच आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले असून पावसाळी आजाराचे प्रमाण आटोक्यात आहे, असा दावा केला आहे.
यंदा जून महिन्यात पावसाने ओढ घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांना अटकाव घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसा वेळ होता. असे असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जोर धरताच शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये पावसाळी आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचा आकडा वाढू लागला असून मलेरिया आणि डेंग्यूसदृश तापाने आजारी असलेल्या रुग्णांचा आकडा बराच मोठा असल्याची माहिती काही खासगी डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. वर्तकनगर परिसरात दोस्ती संकुलात वास्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या ठाणे लोकसभा महिला संघटक सरिता पालांडे यांच्या मृत्यूमुळे सत्ताधारी शिवसेनेचे नेते अस्वस्थ झाले असून आरोग्य विभागाला लक्ष्य करण्याची तयारी या पक्षाच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांनी केली आहे. शनिवारपासून ताप आल्याने पालांडे यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, शरीरातील प्लेटलेट्सची संख्या बरीच कमी झाल्याने मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांची त्यांना डेंग्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे अमान्य केले आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात संताप व्यक्त होत आहे.
गेल्या सहा महिन्यांत ठाणे, मुंब्रा, कळवा परिसरात डेंग्यूसदृश तापाने आजारी असलेले २७ रुग्ण सापडल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला असला तरी हा आकडा बराच मोठा असण्याची शक्यता महापालिकेतील काही लोकप्रतिनिधी व्यक्त करत आहेत. डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यात तयार होतो हे जरी खरे असले तरी शहरात मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी मलेरिया, डेंग्यूच्या डासांची पैदास होण्याची भीती आहे. त्यामुळे घोडबंदरसारख्या परिसरात मलेरियाने आजारी असलेल्या रुग्णांचे प्रमाण इतर भागांपेक्षा अधिक असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ठाणेकरांनी आपल्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घेतल्यास मलेरियासारख्या आजारांना अटकाव घालता येईल, असा दावा आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मलेरिया तसेच डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण काही प्रमाणात आढळत असले तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असेही केंद्रे यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा