मराठीसारखी प्रदीर्घ नाटय़परंपरेचा प्रवाह, एकांकिका स्पर्धामधून येणारे नवोदित कलाकार अशा चांगल्या गोष्टी इतर भाषांमध्ये नाही. त्यामुळेच मराठी भाषेच्या अनेक गोष्टी हेवा वाटण्यासारख्या आहेत. अभिनयामुळे अनेक भाषा शिकलो. त्या त्या भाषांचा सखोल अभ्यास केला. मात्र मराठी भाषेसारखी श्रीमंती इतर भाषांमध्ये नाही. त्यामुळेच मराठी भाषेचा अभिमान वाटतो, असे मत अभिनेता सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले.
रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने अभिनेता सचिन खेडेकर यांची प्रकट मुलाखत संपदा जोगळेकर यांनी घेतली. त्यावेळी अभिनयाची विविध रूपे, भाषेबद्दलची मते आणि अभिनेता म्हणून आलेल्या अनुभवांचे कथन सचिन खेडेकर यांनी यावेळी केले. मराठीव्यतिरिक्त इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटसृष्टी प्रामुख्याने डबिंगवर सुरू आहे. कारण मराठी भाषेसारखी समृद्ध परंपरा आणि श्रीमंती इतर भाषांमध्ये नाही. केवळ एक व्यक्ती म्हणून ज्या गोष्टी शिकलो असतो, त्यापेक्षा अधिक गोष्टी अभिनेता म्हणून काम करताना शिकता आल्या. मराठी भाषा अमराठी व्यक्तीनेही त्याच वजनाने बोलावे, अशी आपली इच्छा आहे. प्रत्येकालाच आपल्या भाषेबद्दल अभिमान असतो. त्यामुळे इतर भाषाही त्या भाषिकांप्रमाणेच चांगल्या पद्धतीने आणि वजनासहित बोलण्याच्या उद्देशाने मी भाषा शिकलो. अन्य भाषा शिकण्याची संधी त्यामुळे कधीच सोडली नसल्याचे खेडेकर म्हणाले. सध्या अभिनय क्षेत्रात येणारे कलाकार, विशेषत: अभिनेत्री या दक्षिणेतील चित्रपटांमध्ये कामाची सुरुवात करतात. मात्र त्या तेथील भाषाच शिकत नाहीत. शूटिंगवेळी त्या केवळ त्या लयीत आकडे उच्चारतात आणि त्यानंतर डबिंग कलाकार त्यावर डब करतात. ही अत्यंत हास्यास्पद बाब असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. सुभाषचंद्र बोस यांची भूमिका हा आपल्या अभिनय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा