राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विजयसिंह मोहिते पाटील यांना डावलले जात असल्याची भावना व्यक्त करीत २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री पाहिजे असेल तर त्यांना बरोबर घेऊन जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत राष्ट्रवादीच्या जिल्हा संपर्क अभियानात कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर जिल्ह्य़ातील या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, आ. हणमंत डोळस, पं. स. सभापती राजलक्ष्मी माने पाटील, माजी जि. प. अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, मदनसिंग मोहिते पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, जि. प. सदस्य धैर्यशील मोहिते पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मनोहर डोंगरे यांनी पक्ष विजयदादांना डावलत असल्याची भावना कार्यकर्त्यांत निर्माण झालेली आहे. ती पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण करणार असून इथून पुढच्या काळातही आपण त्यांच्या बरोबरच राहणार असल्याची ग्वाही दिली व जनावरांच्या छावण्या बंद न करण्याचे आवाहन केले.
अभियानात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प केवळ सोलापूर जिल्ह्य़ापुरता नसून तो राज्यासाठी असल्याने तो झाला पाहिजे. उजनीतील पाण्याचे ढिसाळ नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. यावेळी आ. हणमंत डोळस, राजलक्ष्मी माने पाटील आदींची भाषणे झाली.

Story img Loader