रॅगिंगची तक्रार करूनही दखल नाही
दिवसभर ‘ऑनडय़ुटी’ राहण्याची सक्ती करून नैसर्गिक विधीकरिताही मोकळीक न देणाऱ्या भायखळ्याच्या ‘मसिना रुग्णालया’तील वरिष्ठांविरोधात राज्याच्या ‘वैद्यकीय शिक्षण विभागा’कडे एका महिला ज्युनिअर डॉक्टरने रॅगिंगची तक्रार दाखल करून तीन महिने झाले तरी दखल घेण्यात आलेली नाही. खासगी रुग्णालयाच्या कारभारात सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही, असे सांगत विभागाचे अधिकारी या प्रकरणातून हात झटकत आहेत. त्यामुळे न्याय तर दूरच, पण या २९ वर्षीय तरुण विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्षही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देविका बल्लाळ (नाव बदलले आहे) ही ज्युनिअर डॉक्टर मसिना रुग्णालयात स्त्रीप्रसूतीशास्त्राचा पदविका अभ्यासक्रम करते आहे. सहा महिने तिला इतर विभागात कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम करायचे होते. पण तिला प्रसूती विभागातच काम करण्यास भाग पाडण्यात आले. प्रवेश घेतेवेळेस रुग्णालयाशी झालेल्या करारात सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत काम करावे आणि उरलेल्या वेळेत रुग्णालयाच्या कॅम्पसवर हजर राहणे बंधनकारक होते; परंतु दररोज दिवसाचे २४ तास वॉर्डातच या ना त्या कारणाने अडकवून ठेवले जात असल्याची देविकाची तक्रार आहे.
‘जेवण किंवा अंघोळीसारख्या वैयक्तिक कामासाठीही वेळ दिला जात नव्हता. वरिष्ठांना थोडीफार दया आली तर ते एक-दोन तास झोपण्यास सांगत. एक महिना मी प्रसूती विभागातच राहत होते. त्यात रुग्णांची काळजी घेणे, दाखल करून घेणे, प्रसूतीच्या वेळेस मदत करणे, रेकॉर्ड ठेवणे, डिसचार्ज देणे आदी कामांबरोबरच वरिष्ठांचे डबे पोहोचविणे, त्यांच्या डय़ुटय़ा करण्याची कामेही करावी लागत. महिनाभर हा त्रास सहन केल्यानंतर मात्र माझ्या सहनशीलतेचा अंत झाला. या त्रासामुळे अशक्तपणा आल्याने मी एक दिवसाची रजा मागितली, तर तीही मला नाकारण्यात आली,’ अशी देविकाची तक्रार आहे.
या संदर्भात रुग्णालयाच्या प्रशासनाकडे आणि वैद्यकीय संचालनालयाकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. म्हणून तिने ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत ३ आणि १६ एप्रिलला वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रार केली. मात्र, विभागानेही तिच्या या तक्रारीची गंभीरपणे दखल घेण्याऐवजी टोलवाटोलवी चालविली आहे. दोन महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर देविकाच्या तक्रारीवर चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची हमी विभागाने दिली. मात्र समितीतील सदस्यांच्या पात्रतेबाबत शंका उपस्थित करीत रुग्णालयाने संबंधितांची चौकशी करू देण्यास नकार दिला. आता खासगी रुग्णालयाच्या व्यवहारात सरकारला लक्ष घालण्याचा अधिकार नाही, असे सांगून रुग्णालयाच्या प्रशासनाने अरेरावीची भूमिका घेतली आहे. ‘दुर्दैवाने विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या अरेरावीसमोर नमल्याने देविकाच्या तक्रारीची दखल आजपावेतो कुणीच घेतलेली नाही,’ अशी तक्रार फोरमचे अध्यक्ष जयंत जैन यांनी केली आहे.

रॅगिंगचे कायदे लागू नाहीत
देविकाचे आरोप बिनबुडाचे आहेत. तसेच आमचे रुग्णालय खासगी असून रॅगिंगशी संबंधित कायदेच लागू होत नाहीत.
शकील अन्सारी, प्रशासक, मसिना रुग्णालय

Story img Loader