शासनाने दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली ‘एक गाव एक गणपती’ किंवा ‘एक वॉर्ड एक सण-उत्सव’ ही संकल्पना राज्यातील शहरी भागात सपेशल अयशस्वी ठरली आहे. ग्रामीण भागातील प्रतिसाद पाहता ती शहरातही राबविण्याचा निर्णय राज्याच्या गृहमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी घेतला होता. अद्यापही ती शहरी भागात राबवण्याचे आव्हान कायमच आहे.  
ग्रामीण किंवा शहरी भागात ‘एक गाव एक गणपती’ किंवा ‘एक वॉर्ड एक सण-उत्सव’ हा प्रयोग राबण्याचे मोठे आव्हान असल्याचे तंटामुक्ती समितीमधील अनेक सदस्यांनी बोलून दाखवले. अनास्था, स्पर्धा व राजकारण त्यास कारणीभूत ठरले आहे. चांद्यापासून बांद्रय़ापर्यंत चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, नागपूर असो वा नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई असो, गल्लीबोळात सार्वजनिक मूर्तीची स्थापना होते. एकाच गल्लीत दोन-दोन, तीन-तीन सार्वजनिक मूर्तीची स्थापना केली जाते. ग्रामीण भागातही चित्र फारसे वेगळे नाही. नागपूर शहरात दरवर्षी साधारण अडीचशेहूनअधिक मूर्तीची सार्वजनिक स्थापना होत असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. प्रत्यक्षात ही संख्या त्याहून जास्त असते. सार्वजनिक मंडळांची आपसात स्पर्धा लागलेली असते. वाढत्या महागाईचा फटका या मंडळांनाही बसतो. नागरिकांकडून गोळा झालेल्या वर्गणीतून खर्च भागत नसल्याने राजकारण्यांकडे हात पसरावे लागतात. त्यामुळे सार्वजनिक उत्सव हे राजकारणाचे माध्यम झाले आहे. एकाहून अधिक मंडळांना भरघोस आर्थिक मदत करण्यात राजकारण्यांची स्पर्धा लागलेली असते. राजकारणात तग धरायचा असेल तर आर्थिक मदतीचा हात सैल सोडणे त्यांनाही गरजेचे झाले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागात  २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू केली. सप्टेंबर २०१२ पासून राज्यातील शहरी भागात तिची अंमलबजावणी सुरू झाली. ग्रामीण भागात या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा शासनाने तेव्हा केला होता. तंटामुक्तीसाठी विविध योजना, उपक्रम हाती घेण्यात आले. विदर्भासह नागपूर ग्रामीण भागातील सर्वच गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’साठी सप्टेंबर २०१२ पासून प्रयत्न सुरू झाले. अद्यापही प्रयत्नच होतो आहे.
मागीला वर्षी २०१३ मध्ये नागपूर ग्रामीणमध्ये १४८ गावात ‘एक गाव एक गणपती’चा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. नागपूर ग्रामीणमध्ये दोन वर्षांपूर्वी दोनशे गावात हा प्रयोग राबविण्यात आला होता. हे खरे असले तरी प्रत्यक्षात काही जिल्ह्य़ांचा अपवाद वगळता विदर्भातील जिल्ह्य़ांनी शंभरीही गाठलेली नाही. राज्यात काही ठिकाणी यास मोहीम सुरू झाली तेव्हा चांगला प्रतिसाद मिळाला होता. शहरी भागात मागील वर्षी अपेक्षित प्रतिसाद मिळालाच नाही.  
 ‘एक गाव एक गणपती’ किंवा ‘एक वॉर्ड एक सण-उत्सव’ या संकल्पनेबद्दल काही राजकीय पुढारी भरभरून बोलले, मात्र निवडणुका तोंडावर असल्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवरच. ही संकल्पना पुढाऱ्यांना पटत असली तरी जनभावनेवर त्यांचा राजकीय खेळ अवलंबून असल्याने लोकेच्छा असणे आवश्यक असल्याचे मत या राजकीय नेत्यांनी व्यक्त केले. राजकारण्यांना ही संकल्पना पटत असली तरी ती राबविण्यास ते धजावत नसल्याने ती जनतेला पटवून देण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांवर येऊन पडली.
वास्तव हे आहे की ही संकल्पना राबविण्याची बहुतांशी पोलिसांची मानसिक तयारीच नाही. या मोहिमेबद्दलची अनास्था असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा परिस्थितीमुळे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत ‘एक गाव एक गणपती’ किंवा ‘एक गाव एक सण, उत्सव’ची संकल्पना राबविणे नागपूरसह संपूर्ण राज्यातील शहरी भागात आव्हान ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम व ‘एक वॉर्ड एक सण, उत्सव’ संकल्पना शहरात राबविण्याचे शासनाने दोन वर्षांपूर्वी ठरवले असले तरी शहरी भागात राबविण्याबाबत काही अडचणी लक्षात घेता ती कशी राबवायची या दृष्टीने मूर्त रूप देणे सुरू आहे. तरीही ती प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न राज्यातील पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सुरू आहेत. नागपूर आयुक्तालयात अशी ३७ गावे येतात. या योजनेमागील उद्देश  रुजवण्याचे काम पूर्वीपासूनच राज्यात सुरू आहेत. सेवानिवृत्त पोलीस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय त्यांच्या कार्यकाळात विविध ठिकाणी सर्वधर्म समभाव समितीच्या माध्यमातूनजातीय सलोखा कार्यक्रम आयोजित करीत. उद्देश एकच असला तरी त्याची अंमलबजावणी अधिकारी विविध प्रकारे करीत असतात. नागपुरात आजही ईद, दिवाळी आदी विविध सणांच्या काही दिवस आधी प्रमुख नागरिकांच्या बैठकीत तंटामुक्ती मोहीम व ‘एक वॉर्ड एक सण, उत्सव’ संकल्पना राबविण्यासंबंधी आवाहन केले जाते. वर्तमान पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक, सहपोलीस आयुक्त अनुपकुमारसिंह यांच्यासह सर्वच पोलीस अधिकारी सदैव प्रयत्नशील असतात.
-सुनील कोल्हे, अतिरिक्त आयुक्त गुन्हे शाखा