‘मुली वाचवा’ अभियानांतर्गत मंगळवेढा येथे संत चोखामेळा चौकातील श्रीगणेश मंदिर परिसर रांगोळी, हजारो पणत्यांची नेत्रसुखद आरास, सुमधुर बासरीवादन अशा मंगलमय वातावरणात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
सांगली संस्थानच्या या श्रीगणेश मंदिरामध्ये गेल्या अकरा वर्षांपासून दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. यंदा या उत्सवासाठी सुमारे पाच हजार गणेश भक्तांनी मंदिरात हजेरी लावून गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी प्रायमा आर्ट अॅड क्राफ्टच्या विद्यार्थी कलाकारांनी मंदिर परिसरात अथक परिश्रम घेऊन सुबक व आकर्षक अशा रंगावलींसह पायघडय़ा काढल्या होत्या. अमित भोरकडे, राजू रायबान व वल्लभ शिंदे यांनी काढलेली श्रीगणेशाची रांगोळी, चित्रकार सदानंद जामदार यांनी साकारलेले गणेश विहिरीतील थर्माकोलचे कमळ आकर्षण ठरले. पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य तथा उजनी कालवा क्र. ९ चे वरिष्ठ अभियंता नंदकुमार डिंगरे यांच्या सुमधुर बासरीवादनाने मंगळवेढेकर मंत्रमुग्ध झाले. या वेळी डिंगरे यांना प्रसाद पाटील यांनी तबल्यावर साथ दिली. अखेरच्या टप्प्यात फटाक्यांच्या आतषबाजीने दीपोत्सवाची सांगता झाली.   
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा