दिपावलीच्या आनंदमयी, मंगलमयी वातावरणाची चाहूल तशी नवरात्रीपासूनच लागलीय. शहरातील दुकानाबाहेरील रोषणाई लक्ष वेधून घेतेय. दिवाळीची खरेदी, फटाके, फराळाचे पदार्थ, सहलीचं नियोजन या गोष्टी मग आपोआप आल्याच. आपणच आनंद व्यक्त करून आनंद मिळवायचा. किती छान पद्धत आहे नाही!
आपल्या भारतीय संस्कृतीत साजरा होणारा प्रत्येक सण म्हणजे निसर्ग, ऋतुचक्र आणि मनाच्या अवस्थांची एक सुरेखशी सांगडच आहे. परस्पर नात्यांमधील ओलावा जपण्या-वाढविण्यासाठी तर हे सगळं.
रक्ताची नाती, संपादित नाती आणि शाश्वत नाती या नात्यांच्या पातळीवर चालणाऱ्या या खेळाचा विचार करताना प्रत्येक ठिकाणी प्रेम हा एक धागा हे सगळं बांधून ठेवतो असं दिसतं. तोच धागा नात्यांच्या विविध छटांमधून सतत फिरतोय आणि ते प्रेम व्यक्त करण्याची संधी भाऊ-बहीण, पती-पत्नी ना दिवाळीच्या निमित्तानं मिळते. या लेखाच्या निमित्तानं विचार करू लागले आणि गाणं आणि कवितांशी जवळचं नातं असल्यामुळे अपरिहार्यपणे अनेक गाणी आणि कविता आठवू लागल्या. मराठी भावसंगीतात आणि चित्रपट संगीतात पतिपत्नी, भाऊबहीण, मायलेकराच्या प्रेमाबद्दलची अनेक गाणी आपल्याला सहज आठवतात.
    प्रेमा काय देऊ तुला
    भाग्य दिले तू मला
    भरजरी गं पितांबर दिला फाडून
    द्रौपदीसी बंधू शोभे नारायण
    देव जरी मज कधी भेटला
    काय हवे ते माग म्हणाला
    म्हणेन प्रभू रे माझे सारे
    जीवन देई मम बाळाला
प्रेम ही केवढी मोठी ताकद आहे नाही! प्रेम ही कुठल्याही सचेतन गोष्टीला आकार देणार, आधार देणारी, त्याच्यातील सुधारणांना गती देणारी आणि संरक्षण देणारी चेतना आहे.  खरंतर परमेश्वर म्हणजेच प्रेम आहे. त्यामुळे प्रेम, जिव्हाळ्याइतकं परिपूर्ण दुसरं काहीच असू शकत नाही. म्हणून अनेक संतांनी अंतरीच्या उमाळ्यानं जीवीचा जिव्हाळा परमेश्वराला किती आर्ततेनं आळवलंय. याच भक्तिमय कृष्णप्रेमानं संत मीराबाई अमर झाली. त्यांच्या अशा अशारीर, त्यागमय प्रेमामुळं नात्यांमधील उदात्तता आणि सखोलता यांचंच पवित्र दर्शन होतं.
त्यामुळेच मग
नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
सगळ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
असं लिहिणाऱ्या ज्ञानपीठविजेत्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना सुद्धा
    युगामागुनी चालली रे युगे ही
    करावी किती भास्करा वंचना
    किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
    कितीदा करू प्रीतिची याचना ।।धृ।।
    अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्
    मला ज्ञात मी एक धूलिकण
    अलंकारण्याला परी पाय तुझे
    धुळीचेच आहे मला भूषण।।   किंवा
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं
असं लिहावसंच वाटलं. ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ ही कविता शाळेत असताना अभ्यासक्रमात होती. तेव्हा जेवढी कळली नाही, तेवढी आता जाणवते.मी १७-१८ वर्षांची असताना ज्येष्ठ कवियित्री शान्ताबाई शेळके यांच्याशी गाण्याच्या निमित्तानं ओळख झाली आणि एक अकृत्रिम स्नेहबंध निर्माण झाला. आमच्या दोघींच्या वयातलं (आणि ज्ञानातलंही) अंतर निदान ४५-५० वर्षांचं. पण ते कधी जाणवलंच नाही. त्या जाऊन आज इतकी वर्ष झाली तरी आठवण झाली, निघाली की नकळत डोळ्यांच्या कडा ओलावतात. श्वास कमी पडू लागतो. मनाची नाती किती घट्ट असतात हे जाणवतं.
शान्ताबाईंची एक कविता नात्यांसंदर्भात मला फार आवडते.
हे एक झाड आहे याचे माझे नाते
वाऱ्याची एकच झुळुक दोघांवरून जाते
त्यात त्या पुढे लिहितात.
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल
कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन
प्रेमाची रुजवणही अशीच नसते का! प्रेम रुजताना फायद्या-तोटय़ाचा विचार करत नाही, किंबहुना असा विचार करून केलं जातं ते प्रेमच नाही.
गुलजार साहेबांनी लिहिलेली एक कविताही हाच विचार दृढ करते.
प्यार कोई बोल नही, प्यार आवाज़्‍ा नहीं
एक खममोशी है सुनती है कहा करती है
ना ये बुझती है ना रुकती है ना ठहरी है कहीं
नूर की बूंद है सदियोंसे बहा करती है
सिर्फ एहसास है ये रुहसे महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो
विश्वात प्रवाही असणाऱ्या कणांमधून जिवंत होणाऱ्या स्पंदनांच्या प्रवाहात हेलकावे खात, अनेक भावनांच्या जाणिवांनी आपण शिकतो, घडतो, वाढतो, समृद्ध होतो. त्यातील प्रेम, आपुलकी यात अशी ताकद आहे की ज्याने शत्रूही मित्र होऊ शकतात. नात्यांमधील शाश्वत स्पंदनांचा हा प्रवास अशाच चालू राहणार. या जन्मी हे सारं उमगण्याची, व्यक्त करण्याची, भोगण्याची संधी मिळते आहे. हे केवढे भाग्य आहे.
प्रत्येक झाडामाडा त्याची त्याची रुपकळा
प्रत्येक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा
असो ढग असो नग त्याची अद्भुत रेखणी
जी जी उगवे चांदणी तिच्यापरीने देखणी
भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा
भाग्य केवढे आपुली चाले यातूनच यात्रा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा