पावसासोबत येत असलेले साथीचे आजार मुंबईकरांना नवीन नाहीत; मात्र पावसाचे केवळ शिंतोडे उडत असताना ऑगस्टमध्ये ताप, खोकला यांची साथ वाढली आहे. तापमानात सतत होणारे बदल आणि हवेतील बाष्पाचे वाढलेले प्रमाण यामुळे विषाणूंची संख्या वाढली आहे. त्यातच थोडय़ा पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होत असल्याने मलेरियाचे प्रमाणही जास्त दिसू लागल्याची सूचना फॅमिली डॉक्टर देत आहेत.
जूनमध्ये पावसाच्या सुरुवातीलाच ताप, खोकल्याची साथ आली होती. मात्र त्यानंतर तापमान स्थिरावले व ही साथही त्या प्रमाणात आटोक्यात राहिली. मात्र गेल्या पंधरा दिवसांत पाऊस आणि उन्हाची सुरू असलेली लपाछपी विषाणूंसाठी नंदनवन ठरली आहे. तापमानात वाढ झाली आणि हवेत बाष्प असले तरी विषाणूंची संख्या वाढते. त्यामुळे त्यांचा संसर्ग होण्याचीही शक्यता वाढते. तापमानात होत असलेल्या बदलांमुळे साधारणत: पाऊस जाताना, सप्टेंबरमध्ये ही साथ येते. मात्र या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने ही साथ ऑगस्टमध्येच दिसू लागली आहे.
त्यामुळे सध्या तापामुळे व त्यासोबत येत असलेल्या सर्दी-खोकल्याने अनेकजण हैराण आहेत. जून-जुलच्या तुलनेत सध्या तापाच्या रुग्णांमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. हा ताप साधारणत: विषाणू संसर्गाचा आहे. या तापासोबतच घशाचा संसर्ग होत असल्याने सर्दी, खोकल्याचेही रुग्ण वाढले आहेत, अशी माहिती डॉ. जयेश लेले यांनी दिली. मलेरियाचे रुग्णही आता वाढताना दिसत आहेत. थोडय़ा पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने मलेरिया वाढत आहे. मलेरिया वाढण्याचे प्रमाण खूप जास्त नसल्याचेही डॉ. लेले यांनी स्पष्ट केले.
विषाणुसंसर्गाचा ताप तीन दिवसांत कमी होतो. त्यामुळे त्याला घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. तापासोबत उलटय़ा, जुलाब होत असतील, खूप जास्त ताप येत असेल तर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. लहान मुले, वृद्ध यांची प्रतीकारक्षमता कमी असल्याने त्यांना या आजारांचा अधिक त्रास होतो. त्यामुळे त्यांच्याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा