उन्हाचे चटके आणि घामाच्या धारा यामुळे हैराण झालेल्यांना बर्फाचे गारेगार पाणी हा एकदम सोपा व रामबाण उपाय वाटत असला तरी त्यामुळे घशाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हात फिरणाऱ्यांसोबतच घराच्या आश्रयाला असलेल्यांनाही ताप, सर्दी व खोकल्याने हैराण केले आहे. मुंबईत उष्माघाताचा धोका नसला तरी उष्म्याच्या भीतीने जवळ केलेल्या थंडगार पेयांमुळेच आजार वाढले आहेत.
पावसाळ्यात किंवा थंडी लांबल्याने मुंबईत आजारांच्या साथी येतात. मात्र उन्हाळ्यातील कडक तापमानातही विषाणूसंसर्गामुळे ताप आलेल्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. याला कारणीभूत ठरले आहेत ती थंडगार पेय. घामाच्या धारा वाहत असल्याने शरीरातील पाणी वेगाने कमी होते. त्यासोबतच शरीराला क्षार व साखरेचीही गरज भासते. तातडीने थंडावा मिळण्याच्या नादात थंडगार पाण्याचे ग्लासच्या ग्लास रिचवले जातात. शरीराच्या तापमानात कमालीचा फरक पडल्याने विषाणूंच्या वाढीला अनुकूल स्थिती निर्माण होते. त्यामुळे घशाला संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते. रस्त्यावरील विक्रेत्यांकडील अस्वच्छ पाण्यातील सरबतांवाटेही विषाणूसंसर्गाचा धोका वाढतो.
सध्या विषाणू संसर्गामुळे तापाचे रुग्ण वाढलेले आहेत.  १०२-१०३ फॅरनहाइटपर्यंत ताप जात असलेले रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. या तापासाठी काही वेळा घशाकडे होणारा संसर्ग कारणीभूत ठरतो, असे डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. काही वेळा उष्णतेमुळे नाकातून पाणी वाहत असल्याच्या तक्रारी घेऊन रुग्ण येतात. मात्र हा त्रास उष्णतेचा नसून विषाणूसंसर्गाचा असतो. उकाडय़ाचा त्रास कमी करण्यासाठी अतिथंड पेय घेऊ नयेत, त्यामुळे जंतुसंसर्गासोबत पोटदुखी, जुलाबाचाही त्रास होतो. नियमित पाणी पीत राहिल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते तसेच अतिथंड सरबत पिण्याचा मोहही आवरता येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.