महात्मा फुले स्मारक आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक जोडण्याची तसेच परिसर सुशोभीकरणाची योजना मार्गी लावण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांकडे केली.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नायगाव येथे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. फुले स्मारक जोडण्याची योजना अजूनही कागदावरच आहे, असे वृत्त ‘लोकसत्ता’ ने गुरुवारी प्रसिद्ध केले आहे. या वृत्ताचा संदर्भही भुजबळ यांनी कार्यक्रमात दिला. फुले स्मारकासाठी आखण्यात आलेली योजना लवकरात लवकर पूर्ण करावी, असे निवेदनही पुण्यातून या कार्यक्रमासाठी नायगाव येथे गेलेले समता परिषदेचे पदाधिकारी कृष्णकांत कुदळे, राजू घाटोळे, प्रकाश लोंढे, युवराज भुजबळ आदींनी यावेळी दिले.
महात्मा फुले यांच्या पुणे विद्यापीठातील पुतळा अनावरणासाठी तसेच फुले वाडय़ातील कार्यक्रमासाठी आपण आला होतात. आता पुण्यातील फुले वाडा व स्मारकासंबंधी आखण्यात आलेल्या योजना पूर्ण होण्यासाठी कामात आपण लक्ष घालावे. म्हणजे हे काम मार्गी लागेल, अशी अपेक्षा भुजबळ यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा