सिडकोच्या दक्षता विभागाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सिडको कामगार संघटनेच्या १०० सदस्यांविरोधात प्रशासनाने पोलीस तक्रार दाखल केल्याने कामगार संघटनेने कर्मचाऱ्यांच्या मानसिक छळाविरोधात पुकारलेल्या आंदोलनाची तलवार म्यान केली असून आंदोलनाचा फज्जा उडाला आहे.
सिडकोतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी मुख्यालयात विशेष दक्षता विभाग सुरू केला आहे. पोलीस महासंचालक दर्जाच्या डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग काम करीत आहे. सिडकोत आतापर्यंत १२ कर्मचारी अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाकडून कारवाई सुरू आहे. त्यामुळे सिडकोतील संशयास्पद प्रकरणांची या विभागाच्या वतीने छाननी केली जात आहे. सिडकोच्या कोणताही कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार आल्यास हा विभाग चौकशी करण्यास सुरुवात करीत असतो.
खारघर येथील एका ठेलेवाल्याने अतिक्रमण विभागातील विकास अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीवरून त्या अधिकाऱ्याच्या चौकशीने त्याला भंडावून सोडले होते. हा विभाग कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी सिडको प्रवेशद्वारावर चौकशी अधिकारी पद्माकर जुईकर यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यावेळी या आंदोलनाला न जुमानता दक्षता विभागाने कणखर भूमिका घेतली व आंदोलन करणाऱ्या १०० कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी जबाब लिहून द्यावे लागले. पोलीस तक्रार दाखल करू लागल्याने त्या भीतीपोटी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या ताठर भूमिकेची तलवार म्यान केली आहे. चौकशी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन आंदोलन केल्याने कामगार संघटना मात्र तोंडघशी पडली आहे. या विभागाने भविष्यात होणारा त्रास कमी व्हावा यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करला होता व आंदोलनाचा एक भाग म्हणून जुईकर हटावचा नाराही दिला होता. परंतु दक्षता विभागाच्या कणखर भूमिकेमुळे कामगार संघटना अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

Story img Loader