आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडून बंद पडलेल्या बीड जिल्हा सहकारी बँकेत अनेकांच्या घामाचे पैसे अडकून पडले. ठेवी देणे बंद झाल्यामुळे रोज शाखांसमोर हक्काच्या पैशासाठी येऊन ग्राहक निराश होतात. अशा स्थितीत दिवाळीत मात्र छोटय़ा ठेवीदारांच्या एक कोटीच्या ठेवी परत करून १५ हजार कुटुंबीयांचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न प्रशासकीय मंडळाने केला. मागील ८ महिन्यांत थकीत कर्जवसुली करून १०० कोटींच्या छोटय़ा ठेवीदारांचा पैसा देण्याचा प्रयत्न प्रशासकीय मंडळाने केला.
जिल्हा बँक वर्षभरापूर्वी आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर संचालक मंडळाने जबाबदारी ढकलून राजीनामे दिले व ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले. बाराशे कोटींच्या ठेवी असलेल्या या बँकेत ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी यांचा घामाचा पैसा बँकेत अडकला. ८० शाखांच्या माध्यमातून सुरू असलेली ही बँक एकदम बंद पडल्याने ठेवीदार हवालदील झाले. प्रत्येक दिवस शाखेसमोर येऊन घामाचा पैसा मिळण्यास रांगा लावू लागले. मात्र, निराशाच पदरी पडली. अशा स्थितीत सरकारने बँकेवर अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मंडळ नियुक्त केले.
प्रशासकीय मंडळाने बँकेला चालू करण्यास विविध मार्गानी प्रयत्न केले. बडय़ा थकबाकीदारांकडून वसुली होत नसल्यामुळे मंडळाचे प्रयत्नही तोकडे पडले. सुरुवातीला थकीत कर्जाची वसुली करीत छोटय़ा ठेवीदारांच्या ठेवी देण्याचा प्रयत्न सुरू झाला. यात मुलींचे लग्न, आजारपण व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची रक्कम यांना प्राधान्य देण्यात आले. कर्ज वसूल झाले की प्राधान्यक्रमाने गरजवंत ठेवीदारांना टप्प्या-टप्प्याने पैसे देण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातून मागील ८ महिन्यांत जवळपास १०० कोटींहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात आल्या.
ऐन दिवाळीत घामाच पैसा मिळत नसल्याने शिमगा करण्याची वेळ ठेवीदारांवर ओढावली. दरम्यान, दुष्काळी स्थिती व पुढाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणातून प्रशासकीय मंडळाच्या वसुलीला शासन स्तरावरून ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी देणे बंद करण्याची घोषणा करण्यात आली.
दिवाळीत अनेकांच्या घरी चूल पेटणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे प्रशासकीय मंडळाने सेवानिवृत्त व छोटय़ा ठेवीदारांना थोडय़ाबहुत प्रमाणात ठेवींचा पैसा देण्याचा निर्णय घेतला. चार दिवसांत प्राधान्यक्रमाने १५ हजार ठेवीदारांना तब्बल एक कोटी रुपये वाटप करण्यात आले. त्यामुळे या कुटुंबीयांना दिवाळीचा सण साजरा करता आला.      

Story img Loader