२९ ऑगस्ट २००८ चा दिवस उजाडला तोच मराठी समाजासाठी अत्यंत वाईट बातमी घेऊन.. आपल्या सौंदर्य, अभिनय, नृत्य, सामाजिक बांधीलकी व समंजस वागणे या गुणांमुळे ओळखल्या जाणाऱ्या जयश्री गडकर यांचे पहाटेच निधन झाले.
बातमी कळताच हाजी अली येथील त्यांच्या निवासस्थानी धावलो असता मराठी चित्रपटसृष्टीतील सुलोचनादीदी, जीवनकला, आशा काळे, उमा भेंडे, अलका आठल्ये अशा मान्यवरांसह अलीकडच्या पिढीतील मनीषा केळकर आणि अन्य काही जयश्रीजींच्या अंत्यदर्शनासाठी हजर असल्याचे दिसले. बाळ धुरी अर्थातच काहीही बोलण्याच्या अवस्थेत नव्हते.
जयश्री गडकर यांच्या जाण्याने एक खूप मोठा रुपेरी प्रवास थांबला. व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात एका गाण्यात संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक युवती असा जयश्रीजींचा प्रवास सुरू झाला व पुढे जाऊन जयश्री गडकर नावाचा एक अलौकिक इतिहास आकाराला आला. मेहनत करण्याची तयारी, कोणत्याही प्रकारच्या कष्टात माघार न घेणे व व्यावसायिक निष्ठा या गुणांवर ‘जयश्री गडकर’ या नावाभोवती ‘वलय आणि वळण’ आकाराला आले. राजा परांजपे दिग्दर्शित ‘गाठ पडली ठका ठका’ या चित्रपटात त्यांना सर्वप्रथम महत्त्वाची भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांनी सतत पुढेच पावले टाकली. ‘आलिया भोगासी’ या चित्रपटापासून त्यांची नायिका म्हणून कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या नावांत ‘सांगत्ये ऐका’, ‘अवघाची संसार’, ‘मानिनी’, ‘रंगपंचमी’, ‘शाहीर परशुराम’, ‘बाप माझा ब्रह्मचारी’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘वैशाख वणवा’, ‘साधी माणसं’, ‘पाटलाची सून’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘जिव्हाळा’, ‘घरकुल’, ‘सुगंधी कट्टा’ यांचा समावेश होतो, पण अशा केवळ चित्रपटांच्या नावानेच त्यांचे मोठेपण मोजणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटाची नायिका अशी त्यांची ‘ओळख’ घट्ट झाली असता त्या शहरी भूमिकेला न्याय देऊ शकणार नाहीत, अशा होणाऱ्या चर्चेला त्यांनी ‘मानिनी’ चित्रपटातूनच चोख उत्तर दिले.
जयश्री गडकर चित्रपटसृष्टीत आल्या तेव्हा अनेकांना वाटत होते की, ही अपऱ्या नाकाची, साध्या सरळ भांगाची काकू म्हणूनच जमा होणारी पोरगी नायिका म्हणून प्रभाव तो काय पाडणार, पण जयश्री गडकर सुरुवातीपासूनच सहजी हार मानणाऱ्या नव्हत्या. त्यांच्या कलाजीवनाची वाटचाल ‘रुपेरी’ होती, तितकीच ती ‘काटेरी’देखील होती. त्यांना अनंत यातना भोगाव्या लागल्या, पण कामावरच्या निष्ठेमुळे त्या त्यातून सहीसलामत बाहेर पडल्या. त्यांनीच आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात दिग्दर्शिलेल्या ‘सासर माहेर’ व ‘अशी असावी सासू’ या चित्रपटांच्या निमित्ताने त्यांच्या दीर्घ मुलाखतीचे योग आले असता त्यांचा बराचसा ‘फ्लॅशबॅक’ जाणून घेता आला, त्यात त्यांच्या किती तरी बऱ्या-वाईट आठवणी व अनुभवाचे भांडारच रिते झाले. दिग्दर्शक अनंत माने यांच्या १९ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या व त्यांना त्या आपल्या गुरू मानत. त्यांना त्या अण्णा म्हणत. त्यांना नेमके काय हवे हे जयश्रीजींना पटकन समजे.
आपल्या अभिनय कलेचे सामथ्र्य अण्णांना जास्त माहीत आहे, अशी जयश्री गडकर यांची भावना होती. त्यांच्याच दिग्दर्शनातील ‘एक गाव बारा भानगडी’ हा चित्रपट पुण्यातील मुक्कामात एकदा दिलीपकुमारने पाहिला व अभिप्राय दिला होता, ‘चांगला चित्रपट आहे. तो पाहताना वेळ कधी व कसा निघून गेला हे कळलंच नाही. रंजन करता करता हा चित्रपट बरेच काही सांगून जातो..’ दिलीपकुमारचे हे बोलर जयश्रीजींच्या ‘आठवणींचा खास ठेवा’ ठरले. अशा किती तरी आठवणींच्या प्रवासात जयश्रीजींची वाटचाल झाली. किती तरी लोकप्रिय गीतांमधून जयश्रीजींच्या नृत्याचा अर्थात नृत्यातून विविधरंगी अभिनयाचा ठसा उमटला आहे. त्यातील काही गाण्यांचे ‘मुखडे’ आवर्जून सांगायला हवेतच. ‘बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला’ (सांगत्ये ऐका), ‘गेला हटकून बाई भरल्या बाजारात’ (रंगपंचमी), ‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’ (मोहित्यांची मंजुळा), ‘तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं’ (सवाल माझा ऐका), ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’ (मल्हारी मरतड), ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ (मल्हारी मरतड), ‘माळ्याच्या मळ्यामदि पाटाचं पानी जातं’ (साधी माणसं), ऐरनीच्या देवा तुला ठिनगी ठिनगी न्हाऊ दे’ (साधी माणसं), ‘कशी गौळण राधा बावरली’ (एक गाव बारा भानगडी), ‘चढाओढीनं चढवीत होते’ (लाखात अशी देखणी), ‘नाचू किती लाजू किती कंबर लचकली’ (सुगंधी कट्टा) इत्यादी इत्यादी. चित्रपट गीत-नृत्यामधील जयश्री गडकर हा एक स्वतंत्र व मोठा अभ्यासाचा विषय आहे. १९७५ साली बाळ धुरी यांच्याशी विवाह केल्यावरदेखील त्यांनी चित्रपटातून भूमिका करणे सुरूच ठेवले. त्यांनी हिंदी चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या. ‘प्रायव्हेट सेक्रेटरी’त त्या अशोककुमार यांच्या नायिका होत्या. ‘तुलसी विवाह’, ‘बलराम श्रीकृष्ण’, ‘किसान और भगवान’, ‘श्रीकृष्ण लीला’, ‘बजरंग बली’, ‘अमिरी-गरिबी’ अशा किती तरी हिंदी चित्रपटांतून त्यांनी लहान-मोठय़ा भूमिका साकारल्या. विविध प्रकारच्या पुरस्कारांनी हे ‘नक्षत्र लेणं’ विकसित झाले. चित्रपट रसिकांचे त्यांना भरभरून प्रेम लाभले. जयश्री गडकर म्हणजे केवळ एक नाव नव्हे, तर मराठी चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली, बहुरंगी, बहुढंगी वाटचालीचा एक मोठा हिस्सा आहे. त्यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त ही छोटीशी दखल..
बहुरंगी नक्षत्र लेणं
२९ ऑगस्ट २००८ चा दिवस उजाडला तोच मराठी समाजासाठी अत्यंत वाईट बातमी घेऊन.. आपल्या सौंदर्य, अभिनय, नृत्य, सामाजिक बांधीलकी व समंजस वागणे या गुणांमुळे ओळखल्या
आणखी वाचा
First published on: 25-08-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifth death anniversary of marathi actress jayshree gadkar