महात्मा फुले टॅलेन्ट रिसर्च अकादमी व राधिकाताई पांडव इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक आर्थिक समस्या – महात्मा फुले यांचा दृष्टिकोन व भवितव्य’ या विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय महात्मा फुले सामाजिक संशोधन परिषद आयोजित करण्यात येणार आहे.
शहरातील राधिकाताई पांडव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ३ मार्चला होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या हस्ते होणार आहे.
अध्यक्षस्थानी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय सत्यशोधक सुनील सरदार राहतील. पाहुणे म्हणून इव्हान रॅस्कीनो पास्टर, डॉ. पॉल क्लेव्हर (अमेरिका), परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. गोरे, गिरीश कांबळे, उत्तरप्रदेशचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. एन.एन. मूर्ती, बिहारमधील विक्रमशीला हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अमरसिंग वधान, ओरिसातील पत्रकार वसंतकुमार पट्टासनी, सामाजिक कार्यकर्त्यां विद्यावती राजपूत, डॉ. सुषमा यादव, अॅड. रामनारायण चव्हाण, डॉ. बबन तायवाडे आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील. अलाहाबादचे ज्येष्ठ संपादक जी.एस. शाक्य यांचे बीजभाषण होणार आहे.
महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमीच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रा लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांचा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय महात्मा फुले प्रतिभा संशोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रभान भोयर यांचे स्वागतपर भाषण होईल. परिषदेत महात्मा फुले स्मृती गौरवांक २०१३ चे प्रकाशन करण्यात येईल. परिषदेच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्या. के.जे. रोही राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा