मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण यांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका टाकून पूर्ण झाल्या, तरी मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या पाचवीला पुजलेल्या समस्या कमी होतील, याचा नेम नाही. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, दिवा आणि कल्याण या सर्वच महत्त्वाच्या टर्मिनस आणि जंक्शन यांची क्षमता वाढवण्याचे मोठे आव्हान मध्य रेल्वे प्रशासनासमोर आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी या स्थानकांच्या आराखडय़ात, रेल्वेरुळांमध्ये, सिग्नल यंत्रणेत बदल करण्याचे काम मध्य रेल्वेने सुरू केले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते ठाणे यादरम्यान वापरात असलेल्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा अपवाद वगळल्यास वाहतुकीसाठी सध्या मध्य रेल्वेवर केवळ चारच मार्गिका उपलब्ध आहेत. या चार मार्गिकांपैकी धिम्या मार्गिकांवरून फक्त उपनगरीय सेवांची आणि जलद मार्गिकांवरून उपनगरीय सेवांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक होते. त्यामुळे यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि ठाणे ते दिवा यांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका तयार झाल्यावर हा ताण कमी होईल, असा दावाही केला जात आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे योग्य नसून केवळ मार्गिका बांधून रेल्वेपुढील समस्या कमी होणार नाहीत, असे स्पष्टीकरण मुंबईचे विभागीय रेल्वे आयुक्त अमिताभ ओझा यांनी केले आहे. सहा मार्गिका वापरात आल्यावर उपनगरीय सेवा तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांची संख्या वाढवणे शक्य होईल. मात्र त्यासाठी टर्मिनस स्थानके आणि जंक्शन यांच्या आराखडय़ात बदल करण्याची गरज असल्याचे ओझा यांनी स्पष्ट केले. कल्याण, ठाणे आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या टर्मिनस व जंक्शन स्थानकांजवळील रेल्वे रुळांचा आराखडा, सिग्नल यंत्रणा बदलावा लागणार आहे. पाचवी-सहावी मार्गिका कोणत्या प्लॅटफॉर्मशी जोडावी, याबाबतही ठोस विचार करणे आवश्यक आहे, असे ओझा म्हणाले. त्याचप्रमाणे या मार्गिका कार्यरत झाल्यावर उपनगरीय गाडय़ांची व पर्यायाने प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने या स्थानकांवरील प्रवासी सुविधांमध्येही सुधारणा करावी लागेल. या सर्वच कामासाठी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. पाचवी-सहावी मार्गिका बांधून कार्यरत होण्यासाठीही तेवढा कालावधी लागेल. त्यामुळे त्यानंतरच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

Story img Loader