काळ कितीही, कसाही पुढे सरकला तरी काही ‘हिंदी चित्रपट गीते’ त्या काळासोबत ‘चालत’ राहतात. ‘ब्लफमास्टर’ या १९६३ सालच्या चित्रपटातील ‘गोविंदा आला रे आला’ हे प्रचंड उत्साहवर्धक, जोशपूर्ण गाणे त्याच ‘चाली’ने आजचेही वाटते. शम्मी कपूरच्या धसमुसळ्या नृत्याने ‘धूम’शान केलेल्या या गाण्याचा ५० वर्षांचा यशस्वी प्रवास कधी बरे पार पडला याची काहीच कल्पना येत नाही, हेच या गाण्याचे ‘यश’ आहे. हिंदी-मराठी चित्रपटांतून त्यानंतर ‘गोविंदा गीते’ बरीच आली अथवा नाचली, पण कोणालाही या ‘गोविंदा आला रे आला’चा ठसा पुसता आला नाही. (काही प्रमाणात ‘हमाल! दे धमाल’च्या ‘खिडकीतल्या ताई असे वाकू नका’ या गोविंदा गीताचा अपवाद; २५वर्षांनंतरही त्या नृत्य गाण्याची धमाल तेवढीच ताजी वाटते.)
‘ब्लफ मास्टर’च्या गोविंदा गीताशी संबंधित असे निर्माते सुभाष देसाई, त्यांचे दिग्दर्शक बंधू मनमोहन देसाई, धसमुसळा हीरो शम्मी कपूर, गीतकार राजेंद्र कृष्ण आज हयात नाहीत. फक्त संगीतकार कल्याणजी यांचे बंधू व सहकारी आनंदजी आपल्यात आहेत. (तर ‘ब्लफमास्टर’ची नायिका सायरा बानू आज हयात आहे, पण ललिता पवार व प्राण आपल्यात नाहीत.)
संगीतकार आनंदजी यांच्याशी या ‘गोविंदा गीता’संदर्भात संवाद साधला असता ते म्हणाले, ‘‘ ब्लफमास्टरच्या गाण्याच्या संदर्भात तेव्हाच्या आमच्या गिरगावातील मंगलवाडीच्या घरीच बैठका होत. याचे एक कारण म्हणजे देसाई बंधूदेखील गिरगावातील खेतवाडीतील प्रताप निवासमध्ये राहायला होते. मनजींचा सगळा कल जनसामान्यांना काय आवडते हे जाणून घेणे व त्याचा आपल्या चित्रपटांतून समावेश करणे यावर होता. तेव्हा शम्मी कपूरला जनसामान्यांच्या जवळ जाणाऱ्या नृत्याची या चित्रपटात कशी संधी मिळेल अशा गाण्याच्या विचारात आम्ही सगळेच होतो. त्यातूनच या ‘गोविंदा आला रे आला’ या गाण्याची कल्पना सुचली. मनजी तेवढय़ावरच थांबले असते तर त्यात मोठे आश्चर्य होते. त्यांनी शम्मी कपूरला गिरगावात आणून या गाण्यावर नाचायला लावले. त्यामुळे या गाण्याला गोकुळाष्टमीचा खरा रंग आला. महत्त्वाचे म्हणजे, हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून ‘गोविंदा गीत’ देशभर पोहचले व आताच्या ई-कॉमर्स पिढीमुळे ते जगभर पोहचतेय. हे सगळे पाहता तेव्हा आम्ही केलेली मेहनत फळाला आली असे म्हणावे लागेल. पण या गाण्याला ५० वर्षे कधी झाली हे मात्र खरेच समजले नाही.’’ आनंदजीभाई सांगत होते.
असो. आज या गाण्यातील ५० वर्षांपूर्वीचा गिरगावचा मराठमोळा व उत्सवी परिसर पाहताना मूळच्या गिरगावकरांना आठवणीत जाण्याची संधी मिळतेय. आज गिरगावातही टॉवर-संस्कृती शिरली आहे. त्यामुळे आणखी काही वर्षांनी ‘जुने गिरगाव’ कसे होते हे अशा गाण्याच्या माध्यमातूनच पाहावे लागणार आहे.
चित्रपटातून सणांचे दर्शन घडण्याच्या परंपरेत हे ‘गोविंदा गीत’ सर्वाधिक लोकप्रिय ठरलंय. याचे कारण, या सणाचा ‘मूड’ पकडणारा ‘मुखडा’ आहे, मग ‘कच्छी-बाजा’ची योग्य साथसंगत आहे आणि शम्मी कपूरनेही अक्षरश: झोकून देत हे गाणे साकारले आहे. सगळ्याच गोष्टी ‘मस्त’ जमून आल्याने या गाण्याला भरपूर लोकप्रियता मिळाली.
५० वर्षांनंतरही ती लोकप्रियता दमलेली नाही हे तर केवढे कौतुकाचे. हिंदी चित्रपटाची व त्याच्या गीत-संगीताच्या यशाची कारणे शोधू नयेत, तर ती स्वीकारावीत हेच खरे. बोला, गोविंदा आला रे आला…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा