राष्ट्रवादीने माझा एक पुतण्या फोडला तर माझ्यावर प्रेम करणारे हजारो पुतणे तयार आहेत. त्यांनी एक आमदार फोडला, मी त्यांचे १७ फोडले. आर. आर. पाटील यांनी त्यांचा शोध घ्यावा. मला मतदारसंघात गाडून टाकण्याची भाषा करणाऱ्यांना मी पुरून उरेल. या साठी आता बारामतीच्या पवार काका-पुतण्यानेच बीडमध्ये येऊन निवडणूक लढवावी, असे जाहीर आव्हान देताना आघाडीचे सरकार इंग्रजांचा दुसरा अवतार असल्याची घणाघाती टीका खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली.
शहरातील ईदगाह नाका परिसरात मुस्लीम व मागासवर्गीय समाजातील एक हजार कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. भाजपचे सरचिटणीस सर्जेराव तांदळे, भाजयुमोचे भगीरथ बियाणी, डॉ. लक्ष्मण जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकत्रे उपस्थित होते. या वेळी मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा थेट उल्लेख न करता उपस्थित तरुणांकडे पाहात ‘एक पुतण्या फोडला. आता माझ्यावर प्रेम करणारे हजारो पुतणे पक्षात येत आहेत. जिल्हय़ातील सर्व जनता माझी नातेवाईक आहे. त्यामुळे मला मतदारसंघात गाडून टाकण्याची भाषा करणाऱ्यांना मी पुरून उरेल, मी इमानदार मुंडे आहे,’ असे स्पष्ट केले.
लोकसभेत जाताच पहिल्या बाकावर बसण्याची संधी मिळाली. केंद्रात सरकार आल्यानंतर उर्दू भाषेच्या विकासासाठी एक हजार कोटींची तरतूद केली जाईल. मुस्लीम समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असेही मुंडे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा