जामखेड तालुक्याला अखेर कुकडीचे पाणी मिळाले. ‘भगीरथ संघर्षां’नंतरच ही गंगा अवतरली असताना आता तालुक्यात त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय संघर्ष सुरू आहे. चौंडी येथे त्यातूनच आज राष्ट्रवादी व भाजपचे कार्यकर्ते परस्परांना भिडले. धक्काबुक्कीपर्यंत आलेले प्रकरण वेळीच आटोपते घेतल्याने पुढचा संघर्ष टळला.   
जामखेड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच कुकडीचे पाणी चौंडी तलावात पोहचले, त्याचे पूजन आज सकाळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जामखेडचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, राजेंद्र गुंड, नानासाहेब निकत, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र गोरे आदी उपस्थित होते. जलपुजनाचा कार्यक्रम झाल्यावर तिथेच जाहीर सभा घेण्यात आली. सभेत शेलार यांनी राष्ट्रवादीमुळेच जामखेड तालुक्याला कुकडीचे पाणी मिळाल्याचे सांगून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राम शिंदे यांच्यावर पाण्याचे श्रेय घेण्याचा आरोप करतानाच टिका सुरू केली. येथुनच वादंग सुरू झाले.
चौंडी हेच शिंदे यांचे  गाव आहे. त्यांच्यावरील टिका ऐकून आजूबाजूला उपस्थित असलेले भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यांनी राम शिंदे व भाजपच्या घोषणा देण्यास प्रारंभ केला. त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही त्याच पध्दतीने उत्तर दिल्याने क्षणार्धात येथे गोंधळ सुरू झाला. भाजपचे कार्यकर्ते अधिकच संतापले, सभेत घुसून ते शेलार यांच्या दिशेने धाऊन गेले. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही पुढे सरसावले, परसपरांना शिवीगाळही सुरू झाली. मात्र प्रसंगावधान राखून शेलार यांनी कार्यकर्त्यांना शांत करत आपलेच भाषण आटोपते घेत सभाही संपवून टाकल्याने पुढचा संघर्ष टळला.       
उंदड जाहली जलपूजने
चौंडी पाझर तलावात कुकडीचे पाणी आल्यांनतर काल (मंगळवारी) सायंकाळी आमदार राम शिंदे यानी कार्यकर्त्यांंसह जलपूजन केले होते. आज सकाळी राष्ट्रवादीने जलपूजन केले, त्यानंतर राष्ट्रवादी वगळता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुन्हा जलपुजन केले. मधुकर राळेभात, वैजीनाथ पाटील, अमीत जाधव, पी. जी. गदादे, शेरखान पठाण आदी यावेळी उपस्थित होते.